जालना-नांदेड समृद्धी महामार्गाच्या बाजूने ‘बुलेट ट्रेन’ नेण्यासाठी प्रस्ताव दिला आहे ! – अशोक चव्हाण, सार्वजनिक बांधकाममंत्री

अशोक चव्हाण

संभाजीनगर – जालना ते नांदेडपर्यंत समृद्धी महामार्गासाठी ५ सहस्र कोटी रुपयांना संमती देण्यात आली आहे. या महामार्गाच्या भूसंपादनासाठी लवकरच अधिसूचना निघणार असून मार्च २०२२ पर्यंत हे भूसंपादन पूर्ण करण्याचे नियोजन आहे, तसेच नागपूर-मुंबई ‘बुलेट ट्रेन’ही याच जालना-नांदेड समृद्धी महामार्गाच्या बाजूने नेण्यात यावी, यासाठी रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे प्रस्ताव दिला आहे. याविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात येणार आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी २५ सप्टेंबर या दिवशी पत्रकार परिषदेत दिली.

ते पुढे म्हणाले की,

१. जालना-परभणी-हिंगोली-नांदेड हा रस्ता १९० कि.मी.चा असून तो थेट तेलंगणापर्यंत व्हावा, यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनाही विनंती करण्यात येत आहे. त्यामुळे यापुढील रस्ता राष्ट्रीय महामार्गाने केला, तर तो भाग्यनगरपर्यंत जोडता येणार आहे.

२. जालना-नांदेड समृद्धी महामार्गामुळे मुंबईचे अंतर ६ घंट्यांत पूर्ण करता येणार आहे. राज्यात १ मासात नवीन रस्त्यासाठी ‘आशियाई विकास बँके’च्या वतीने निविदा काढण्यात येणार आहेत. याविषयीचा आराखडा सिद्ध करण्याचे काम चालू आहे.

३. या रस्त्यांच्या बांधकामांसाठी १५ सहस्र कोटी रुपये व्यय अपेक्षित आहे. विशेष म्हणजे सर्व रस्ते ‘सिमेंट काँक्रीट’चे असणार आहेत. राज्यात विविध ठिकाणी चालू असलेल्या रस्ते दुरुस्तीसाठीही निधीची कमतरता भासणार नाही.

४. राज्यात ९२ पूल आहेत. ज्या पुलांची अतीवृष्टीमुळे हानी झाली, त्यांची दुरुस्ती करण्यात येईल. यासाठी ५४२ कोटी रुपयांचा निधी मान्य झाला आहे.