जो बायडेन यांनी पंतप्रधान मोदी यांना भेट दिल्या १५७ प्राचीन भारतीय कलाकृती !

न्यूयॉर्क (अमेरिका) – पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेचा दौरा पूर्ण करून भारतात परतत आहेत. त्यापूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी त्यांना १५७ प्राचीन भारतीय कलाकृती भेट दिल्या. या सर्व दुसर्‍या ते १८ व्या शतकांतील आहेत. बायडेन यांनी या कलाकृती परत केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आणि बायडेन यांचे आभार मानले. या कलाकृतींमध्ये देवतांच्या मूर्तीही आहेत.

या वेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, कलाकृती आणि पुरातन वस्तू कोणत्याही देशाचा अमूल्य ठेवा आहे. अशा कलाकृती आणि वस्तू यांची होणारी चोरी, करण्यात येणारा अवैध व्यापार अन् तस्करी यांचा सामना करण्यासाठी भारत आणि अमेरिका कटीबद्ध आहेत.