मनसा (मध्यप्रदेश) येथे महिला पोलीस शिपायावर सामूहिक बलात्कार

बलात्काराच्या घटना रोखण्यासाठी कायदे अपुरे ठरत आहेत; कारण आरोपींना तात्काळ आणि कठोर शिक्षा होत नाही, हे लक्षात घ्या ! जोपर्यंत फाशीची शिक्षा दिली जात नाही, तोपर्यंत असे प्रकार थांबणार नाहीत ! – संपादक

प्रतिकात्मक छायाचित्र

मनसा (मध्यप्रदेश) – येथे एका महिला पोलीस शिपायावर ३ जणांनी सामूहिक बलात्कार करून या घटनेचे चित्रीकरण केल्याची घटना घडली. आरोपींनी या महिलेला ठार मारण्याची धमकी दिली होती. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंद करून मुख्य आरोपींची आई आणि अन्य एकाला अटक केली, तर इतर आरोपी फरार आहेत.

आरोपी पवन याने जानेवारी मासामध्ये या महिला शिपायाशी फेसबूकवर मैत्री केली. नंतर ते प्रत्यक्षातही भेटू लागले. ही महिला शिपाई इंदूरला रहात होती, तर पवन नीमचमधील मनसा शहरात रहात होता. नंतर पवनने या महिलेला स्वतःच्या भावाच्या वाढदिवसानिमित्त मनसा येथे बोलावले. येथे आल्यावर पवन, त्याचा भाऊ धीरेंद्र आणि विजय यांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.