सातारा येथे सैनिक भरतीसाठी विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन !

खासदार उदयनराजे भोसले यांनी घेतली आंदोलकांची भेट

विद्यार्थ्यांना आंदोलन का करावे लागते ? प्रशासन स्वतःहून कृती का करत नाही ? – संपादक 

सातारा, २२ सप्टेंबर (वार्ता.) – गत २ वर्षांपासून सैनिक भरती होत नसल्यामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. या वेळी भाजपचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आंदोलकांची भेट घेऊन त्यांच्या भावना जाणून घेतल्या.

कोरोनाचा संसर्ग अल्प होऊनही भरती प्रक्रियेसाठी अनुमती मिळत नसल्याने सैनिक भरतीसाठी सिद्धता करणार्‍या अनेक विद्यार्थ्यांनी आंदोलनाचा पवित्र घेतला. या वेळी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न जाणून घेतले. तसेच केंद्रीय पातळीवर हा प्रश्न हाताळण्याचे आश्वासन दिले. उपस्थित आंदोलकांनी भरतीविषयी शासनाने लवकरात लवकर निर्णय घ्यावा, सैनिक भरतीसाठीची वयोमर्यादा अजून २ वर्षांनी वाढवून मिळावी, अशा मागण्या खासदार भोसले यांच्याकडे केल्या.