राज कुंद्रा यांची ५० सहस्र रुपयांच्या जामिनावर मुक्तता !

मुंबई – अश्लील चित्रपट निर्मितीच्या प्रकरणात अटक करण्यात आलेले उद्योजक राज कुंद्रा यांची न्यायालयाने ५० सहस्र रुपयांच्या जामिनावर मुक्तता केली आहे. ६२ दिवसांनी राज कुंद्रा यांची न्यायालयीन कोठडीतून सुटका झाली आहे. कुंद्रा यांचा साथीदार रायन थोरोपे यालाही जामीन मिळाला आहे.

अश्लील चित्रपट निर्मितीच्या प्रकरणात पोलिसांना राज कुंद्रा यांचा भ्रमणभाष, भ्रमणसंगणक आणि हार्ड डिस्क यांमधून ११९ अश्लील ध्वनीचित्रफीती (व्हिडिओ) सापडल्याचे वृत्त ए.एन्.आय. वृत्तसंस्थेने दिले. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज कुंद्रा या ध्वनीचित्रफीती ९ कोटी रुपयांना विकणार होते.

१९ जुलै या दिवशी मुंबई पोलिसांनी राज कुंद्रा यांना अटक केली होती. मुंबई गुन्हे शाखेच्या मालमत्ता विभागाने राज कुंद्रा यांच्या विरोधात न्यायालयामध्ये १ सहस्र ५०० पानी पुरवणी आरोपपत्र सादर केले आहे. या आरोपपत्रात राज यांची पत्नी अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांच्यासह ४३ साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत.