हिंदु धर्मशास्त्रानुसार मृत्यूत्तर आणि श्राद्धादी विधी यांचे महत्त्व 

धार्मिक विधी करून पिंडदान केल्यावरच मृत व्यक्तीचा आत्मा तृप्त होतो, हे जाणा ! – संपादक 

१. ‘हिंदु धर्मशास्त्रानुसार मृतदेहाचे दहन करून त्याच्या अस्थीही पवित्र जलात विसर्जन केले जाणे, त्यायोगे शरिरातील पंचमहाभूतात्मक भाग त्या महाभूताला परत दिला जाणे

‘व्यक्ती मृत झाल्यानंतर काही घंट्यांनी शरिराच्या आत विघटनाची क्रिया चालू होते. त्यामुळे दुर्गंधी सुटते. ही दुर्गंधी सुटण्याच्या अगोदर आपण आपल्या पद्धतीप्रमाणे त्या देहाचे दहन करतो, म्हणजे त्या स्थूलदेहाचा संपूर्ण नाश करतो. ज्या पंचमहाभुतांपासून या देहाची निर्मिती झाली, त्या पंचमहाभुतांना आपण तो देह परत देतो. मागे काहीही शेष ठेवत नाही. केवळ त्याच्या अस्थी, म्हणजे राख शेष रहाते. त्या अस्थींमध्ये स्पंदने शेष राहिलेली असतात; म्हणून त्या अस्थी पवित्र नदी, नद्यांचा संगम किंवा समुद्र यांमध्ये विसर्जित केल्या जातात. ‘त्यानंतरच त्या मृत व्यक्तीचे संपूर्ण अस्तित्व संपले’, असे आपण म्हणू शकतो.

प.पू. कै. रामकृष्ण क्षीरसागर महाराज

२. ‘अस्थींमध्ये स्पंदने असतात का ?’, याविषयी एका चिकित्सकाने केलेला प्रयोग आणि त्याचा निष्कर्ष

२ अ. एका चिकित्सकाने त्याच्या घरातील एक व्यक्ती मृत झाल्यावर तिच्या अस्थी मडक्यात घालून ते मडके घराच्या मागे एका कापडात गुंडाळून ठेवणे : ‘अस्थींमध्ये खरोखरच स्पंदने शेष असतात कि नाही ?’, हे कळण्यासाठी एका चिकित्सकाने त्याच्या घरातील एक व्यक्ती गेल्यानंतर हिंदु धर्मशास्त्रातील पद्धतीप्रमाणे मृतदेह दहन केल्याच्या दुसर्‍या दिवशी आणि मृत्यू झाल्याच्या तिसर्‍या दिवशी स्मशानातून काही अस्थी एका मडक्यात गोळा करून घरी आणल्या अन् घराच्या मागे वरच्या बाजूला ते मडके फडक्यात गुंडाळून अडकवून ठेवले.

२ आ. मडके ठेवल्यापासून असंख्य कावळे येऊन त्यांनी मडक्याभोवती घिरट्या घालणे आणि त्यांनी त्या मडक्याला चोचा मारू लागणे : दुसर्‍या दिवसापासून असंख्य कावळे येऊन त्या मडक्याभोवती ‘काव, काव’ करत घिरट्या मारू लागले. काही कावळे त्या मडक्याला चोचाही मारत होते. कावळ्यांना कितीही हाकलले, तरी ते तेवढ्यापुरते लांब जात आणि परत पुन्हा येऊन त्या मडक्याशेजारी बसत.

२ इ. नाशिकला जाऊन अस्थीविसर्जन केल्यानंतर ते रिकामे मडके पुन्हा घरात तसेच कापडाने गुंडाळून बांधून ठेवणे; पण नंतर एकही कावळा न येणे : चार दिवस त्या चिकित्सकाने हे कसेतरी सहन केले. शेवटी तो कंटाळला आणि अस्थीकलश घेऊन नाशिकला गेला. त्याने तेथील ब्राह्मणांकरवी शास्त्रोक्त विधी करवून रामकुंडात अस्थींचे विसर्जन केले. नंतर मोकळे मडके त्याच फडक्यात गुंडाळून आणून त्याने घरात पूर्वीच्या जागी बांधून ठेवले; पण दुसर्‍या दिवशीपासून एकही कावळा त्या बाजूला फिरकला नाही किंवा मडक्याशेजारी येऊनही बसला नाही किंवा मडक्याला चोचाही मारल्या नाहीत.

३. स्थूलदेहाचा जाळून संपूर्ण नाश केला आणि अस्थी विसर्जित केल्या, तरीही त्या मृत व्यक्तीच्या वासना शेष रहाणे, त्या मृत व्यक्तीची वासनापूर्ती केल्यासच त्या मृत व्यक्तीला पुढची गती मिळत असणे

मनुष्याचा देह अन्नमय आहे. त्याने अन्न ग्रहण केले, तरच त्याचा देह काम करू शकतो. त्याने अन्न ग्रहण केले नाही, तर तो लवकर थकून जाऊन अशक्त होईल; म्हणून मृत व्यक्तीच्या वासना शक्यतो अन्नामध्ये शेष रहातात. त्यासाठी तेराव्याच्या  दिवशी शास्त्रोक्त विधी करून अन्नदान केले जाते. ‘त्याने कुठल्याही स्वरूपात येऊन अन्न ग्रहण करून संतुष्ट व्हावे’, हा त्यामागील उद्देश असतो.

४. श्राद्ध-पक्ष यांवर आक्षेप घेणार्‍या सुधारकांना घडलेली जन्माची अद्दल !

४ अ. ‘श्राद्ध-पक्ष थोतांड असून ब्राह्मण लोक दक्षिणेसाठी भीती दाखवतात, पिंडदान करून अन्न वाया घालवले जाते, कुणी पिंडदान केलेच, तर पिंड स्वतःच भक्षण करू’, असे पंढरपूर येथील काही सुधारकांनी सांगणे : पंढरपूरला काही सुधारणावादी धर्मावर टीका करायचे आणि म्हणायचे, ‘‘श्राद्ध-पक्ष इत्यादी सर्व थोतांड आहे. व्यक्ती गेल्यावर कुणीही दहावा आणि तेरावा दिवस करून विनाकारण पिंडदान करून एवढे महागाईचे अन्न वाया घालवू नये. या अन्नाने काही गरीब माणसांची पोटे भरतील. ब्राह्मण लोक दक्षिणा मिळवण्याच्या उद्देशाने सामान्य लोकांना विनाकारण भीती दाखवतात. त्यामुळे कुणीही श्राद्धाचे वेळी पिंडदान करू नये. कुणी अशा रितीने पिंडदान केले, तर आम्ही ते अन्न वाया जाऊ न देता सर्वांसमक्ष त्या पिंडांचा, अन्नाचा स्वीकार करून ते खाऊ.’’

४ आ. पंढरपूरमधील सुधारकांनी एका मृत व्यक्तीच्या तेराव्या दिवशी केलेले पिंडदान खाणे आणि दुसर्‍याच दिवसापासून त्यांच्या सर्वांगावर कोड फुटणे : चार-सहा दिवसांनंतर एक व्यक्ती मृत झाल्यानंतर नियमाप्रमाणे त्याच्या घरच्या लोकांनी तेराव्या दिवशी पिंडदान केले. तेव्हा हे सुधारमतवादी दोघे भाऊ तेथे गेले आणि सर्वांसमक्ष त्यांनी त्याचे भक्षण केले. दुसर्‍याच दिवसापासून त्या दोन्ही भावांच्या अंगावर कोड फुटले आणि त्यांचे संपूर्ण अंग पांढरे पडले. अदृश्य शक्तीने त्यांना शिक्षा केली. ‘अशा प्रकारे अदृश्य जग आहे आणि त्यात अदृश्य स्वरूपात रहाणारे कारणदेहही आहेत’, हेही सिद्ध झाले.

५. व्यक्ती ज्या तिथीला मृत होते, त्या तिथीला त्या व्यक्तीचे शास्त्रोक्त पद्धतीने आवाहन केल्यानंतर मृत व्यक्तीचा आत्मा कुणाच्याही स्वरूपात येणे आणि दिलेले अन्न स्वीकारून तृप्त होत असणे

ज्या तिथीला घरातील व्यक्ती गेली असेल, त्या तिथीला प्रतिवर्षी घरी श्राद्ध करण्याची पद्धत आहे. त्या दिवशी त्या मृत व्यक्तीच्या आवडीचे अन्न शिजवून ब्राह्मण आणि इतर गोरगरीब यांना जेवू घालण्याची पद्धत आहे. शास्त्रोक्त पद्धतीने आवाहन केल्यानंतर मृत व्यक्तीचा आत्मा कुणाच्याही स्वरूपात येतो आणि अन्न स्वीकारून तृप्त होतो. अशा प्रकारे त्याला पुढे गती मिळते.

६. भाऊ-भाऊ विभक्त रहात असतील, तर प्रत्येकाने स्वतंत्र श्राद्ध करावे. 

७. गयेला (बिहार) श्राद्ध केल्यावरही सगळेच पूर्वज मुक्त होत नसल्यामुळे प्रतिवर्षी श्राद्ध करणेच योग्य !

वडिलांचे श्राद्ध गयेला करतात. गयेला विष्णुपदावर पिंडदान केले, तरी प्रतिवर्षी श्राद्ध करावेच; कारण ‘सगळेच पूर्वज मुक्त होतीलच’, असे नाही. गया येथील श्राद्धाचे फळ अक्षय आहे. असे असले, तरी महालय आदी नियमित श्राद्धे केलीच पाहिजेत.

८. आकार असलेल्या दृश्यमान जगातील व्यक्ती प्रत्यक्ष अन्न खाऊन संतुष्ट, तर अदृश्यमान जगातील व्यक्ती केवळ वासाने तृप्त होत असणे, यासाठी मृत व्यक्तीच्या नावे आवाहन करून अन्न ठेवले असता ती तिथे येऊन त्या अन्नाच्या वासाने तृप्त होत असणे

वासापासून वासना निर्माण होते. मार्गावरून जातांना मार्गावरची कांदाभजी आणि इतर खाद्यपदार्थ यांचे वास तुम्हाला आकर्षित करतात. त्या वासामुळे तुमच्या मनात खाण्याची इच्छा, म्हणजे खाण्याची वासना निर्माण होते. तो वास आला नसता, तर खाण्याची वासनाही निर्माण झाली नसती. मनुष्याचा देह हा अन्नमय पिंड आहे. दृश्यमान जगतातील व्यक्ती, म्हणजे जिला आकार आहे, ती प्रत्यक्ष जेवून संतुष्ट होते. जिला आकार नाही, अशा अदृश्यमान जगातील व्यक्ती केवळ वासाने संतुष्ट होतात; म्हणून त्यांना श्राद्ध करून संतुष्ट करावे लागते. एखाद्या व्यक्तीच्या नावाने आवाहन करून वास, म्हणजे अन्न ठेवले जाते, तेव्हा तेथे ती मृत व्यक्ती उपस्थित होते आणि त्याच्यासाठी ठेवलेल्या अन्नाच्या वासाने तृप्त होते; म्हणून ‘पिंडदान करणे’ हा प्रभावी अन् उत्तम विचार आहे.

९. कारणदेहामुळे पृथ्वीवर उत्पत्ती होत असणे; म्हणून हिंदु धर्मशास्त्रात सांगितलेली श्राद्धकर्मे योग्यच असणे

वासनादेह नष्ट झाला असता, तर पृथ्वीवर पुढे उत्पत्तीच झाली नसती. आज पृथ्वीवर जी ७६० कोटी लोकवस्ती दिसत आहे, ती सर्व वासनादेहामुळेच निर्माण झाली आहे. जो अज्ञानामुळे ही कर्मे करत नाही, त्याचे चुकते. वडिलांनी त्यांच्या वडिलांचे श्राद्ध केले आणि हे त्याच्या मुलाने पाहिले, तर वडील गेल्यानंतर मुलगाही त्याच्या वडिलांचे श्राद्ध करील. अशा रितीने मुलावर चांगले संस्कार करा आणि स्वतःच्या पुढच्या गतीची व्यवस्था करा. आपली उत्कृष्ट संस्कृतीच नष्ट झाली, तर भारताची वाताहात होईल.

१०. ‘धार्मिक विधी करून पिंडदान केले जाते, तेव्हाच मृत व्यक्तीचा आत्मा तृप्त होतो’, हे निर्विवाद सत्य असणे; म्हणून श्राद्ध करणे आवश्यकच असणे

आजकाल आपल्यावर परदेशी लोकांची छाप फार पडली आहे. दुसरे म्हणजे काही लोकांमध्ये अती सुशिक्षितपणा वाढला आहे. ते विचारतात, ‘‘श्राद्ध कशाला पाहिजे ? जो गेला, तो संपला.’’ त्यांना वाटते, ‘श्राद्धात अन्नाची नासाडी होते आणि विनाकारण पैसा व्यय होतो. त्याऐवजी हा पैसा कुठल्याही सामाजिक संस्थेला साहाय्य म्हणून देता येईल आणि काही प्रमाणात समाजाचे ऋण फेडता येईल.’ आमच्या मते ही विचारसरणी चुकीची आहे. श्राद्धाची पद्धत किंवा त्या मागचा हेतू तुमच्या लक्षात आला नाही; म्हणून ‘ही पद्धत चुकीची आहे’, असे म्हणणे योग्य नाही. ‘आपण धार्मिक विधी करून पिंडदान करतो. तेव्हाच मृत व्यक्तीचा आत्मा तृप्त होतो’, हे निर्विवाद सत्य आहे.’

– प.पू. कै. रामकृष्ण क्षीरसागर महाराज, नगर (संदर्भ : ‘गुरुवाणी’ (श्राद्धविधी) पुष्प १०)