संस्कार आणि शिक्षा आवश्यक !

प्रतिकात्मक छायाचित्र

जळगाव जिल्ह्यातील एरंडोल येथील १७ वर्षीय मुलगी ‘मैत्रिणीकडे जाते’, असे सांगून घरी परत न आल्याने पालकांनी ‘एका संशयिताने मुलीला आमीष दाखवून पळवून नेले’, अशी तक्रार स्थानिक पोलीस ठाण्यात प्रविष्ट केली. पहूर (जिल्हा जळगाव) येथील एका अल्पवयीन मुलीला गावातीलच एका तरुणाने पळवून नेल्याची घटना घडली. मुलगी घरी न आल्याने शोध घेतला असता तिला १५ किलोमीटर अंतरावरील वाकोद (जिल्हा जळगाव) या गावी सोडून तरुण पसार झाल्याचे लक्षात आले. जामनेर तालुक्यातील नाचणखेडा येथील एकाच कुटुंबातील ३ अल्पवयीन मुली हरवल्याची घटना घडली. पोलिसांनी शोध घेण्यापूर्वीच या तीनही मुली नगर जिल्ह्यातील केडगाव येथे सापडल्याचे नातेवाईकांनी सांगितले.

या सर्व घटना वाचल्यानंतर मन सुन्न होते. महिलांवरील अत्याचारांचे वाढते प्रमाण पहाता ‘असुरक्षित महिला’, ही समस्या अधिक गंभीर बनत चालली आहे. येथे केवळ मोठ्या महिलाच नाही, तर अल्पवयीन मुलीही असुरक्षित आहेत, ही गोष्ट आणखीनच चिंताजनक आहे. महान भारतीय संस्कृती असणार्‍या भारतामध्ये अल्पवयीन मुली अशा प्रकारे असुरक्षित असणे, हे सर्वपक्षीय शासनकर्ते आणि पोलीस प्रशासन यांना लज्जास्पद आहे. ‘ग्रामीण भागात संस्कृती टिकून आहे’, असे आतापर्यंत आपणाला ठाऊक होते; परंतु आता ग्रामीण भागही असुरक्षित झाला आहे. मुले आणि मुली यांच्यावर होणारे लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी ‘बालक लैंगिक कृत्ये संरक्षण कायदा २०१२’ (पोक्सो) अस्तित्वात आला आहे. हा कायदा अस्तित्वात असतांनाही त्याची प्रभावी कार्यवाही होत नसल्याने अशा घटना थांबत नाहीत, ही शोकांतिका आहे.

आता या सर्व परिस्थितीकडे जनतेनेच संवेदनशीलतेने पहाणे आवश्यक आहे. कोणत्याही मुलीवर होणारा लैंगिक अत्याचार हा त्या मुलीसाठी आणि कुटुंबियांसाठी मोठा आघात असतो. असे आघात कुणावर होऊ नयेत, यासाठी प्रत्येकानेच आपल्या मुलांवर संस्कार करणे आवश्यक आहे. संस्कार करण्यामध्ये महिलांसमवेत पुरुषांनीही पुढाकार घेणे महत्त्वाचे आहे. प्रसंगी कठोर होऊन मुलांना महिलांकडे आदराने पहाण्याची दृष्टी द्यायला हवी. कुठेही महिलांवरील अत्याचाराच्या घटना घडल्यास त्यामध्ये पुढाकार घेऊन संबंधित मुलाला कठोर शिक्षा कशी होईल, हे पहायला हवे. मुलांना योग्य मार्गावर आणण्यासाठी संस्कार आणि शिक्षा दोन्ही आवश्यक आहे.

– श्री. नीलेश पाटील, जळगाव