गोहत्या प्रकरणामध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाने आरोपीचा जामीन फेटाळला !

प्रयागराज (उत्तरप्रदेश) – गोहत्या प्रकरणामध्ये आरोपींवर नोंदवण्यात आलेला प्रथमदर्शनी अहवाल (एफ.आय.आर्.) अलाहाबाद उच्च न्यायालयाने रहित करण्यास नकार दिला आहे. ‘घटनास्थळावरून गोवंशियांची हाडे मिळाली असल्याने  याचिकाकर्त्याचा गोहत्येमध्ये सहभाग असल्याचे दिसून येते. त्यामुळे त्याला जामीन नाकारण्यात येत आहे’, असे या वेळी न्यायालयाने स्पष्ट केले.

गोहत्येच्या प्रकरणी याचिकाकर्त्यासह अन्य आरोपींच्या विरोधात ‘उत्तरप्रदेश गोहत्या निवारण अधिनियम, १९५५’ कायद्याच्या अंतर्गत प्रथमदर्शनी अहवाल नोंदवण्यात आला होता. घटनास्थळावर गोवंशियांची हाडे आढळून आल्यामुळे याचिकाकर्त्यांचा गोहत्येतील सहभाग स्पष्ट झाला. त्यामुळे न्यायालयाने त्यांचा जामीन फेटाळला. न्यायमूर्ती रमेश सिन्हा आणि न्यायमूर्ती सरोज यादव यांच्या खंडपिठाने म्हटले की, घरी गुप्तपणे गोवंशियांच्या अवयवांचे तुकडे करत असतांना याचिकाकर्ते आणि सहआरोपी यांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे हे प्रकरण सार्वजनिक व्यवस्थेशी नाही, तर कायदा आणि सुव्यवस्थेच्या परिणामांशी संबंधित आहे.

अलाहाबाद उच्च न्यायालयाने अलीकडेच एका गोहत्या प्रकरणातील आरोपीला जामीन देण्यास नकार दिला होता. त्यावेळी न्यायालयाने म्हटले होते, ‘आम्हाला ठाऊक आहे की, जेव्हा एखाद्या देशाची श्रद्धा आणि संस्कृती यांना धक्का पोहोचतो, तेव्हा देश दुर्बल होतो.’