‘कोव्हिशिल्ड’ लस घेतलेल्या भारतियांना ब्रिटनमध्ये गेल्यास १० दिवस अलगीकरणात रहावे लागणार !

  • ब्रिटनकडून ‘कोव्हिशिल्ड’ला मान्यता देण्यास नकार !

  • भारताचा विरोध

अशा प्रकारचा नियम केलेल्या ब्रिटनचा वसाहतवादी आणि वर्णद्वेषी तोंडवळा समोर आला आहे, असे म्हटल्यास चुकीचे ठरू नये ! भारतानेही याला जशास तसे उत्तर दिले पाहिजे ! – संपादक

नवी देहली – ब्रिटीश सरकारने भारतात उत्पादन करण्यात येणार्‍या ‘कोव्हिशिल्ड’ लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या भारतियांना ‘लस घेतलेले’ मानण्यास नकार दिला आहे. त्यामुळे ज्या भारतियांनी या लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत आणि ते ब्रिटनला जाणार आहेत, त्यांना तेथे १० दिवस अलगीकरणात रहावे लाणार आहे. हा नियम ४ ऑक्टोबरपासून लागू होणार आहे. दुसरीकडे ब्रिटनने अमेरिका, तसेच युरोपमधील देशांतील लसीकरण केलेल्या नागरिकांना थेट ब्रिटनमध्ये येण्याची अनुमती दिली आहे. भारत सरकारने याविषयी ब्रिटनशी चर्चा केली आहे. परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर यांनीही चर्चा केली आहे; मात्र ब्रिटनने हा नियम पालटलेला नाही.

ब्रिटनमध्ये ‘ऑक्सफर्ड-एस्ट्राजेनेका’, ‘फायजर’ आणि ‘मॉडर्ना’ या लसींचे दोन्ही डोस घेतलेल्या प्रवाशांचे अलगीकरण करण्यात येणार नाही. त्यांना थेट प्रवेश देण्यात येईल. ब्रिटनने कोव्हिशिल्डला मान्यता दिलेली नसल्याने ती घेणार्‍यांना ‘लस घेतलेले’ मानण्यास नकार दिला आहे.