काश्मीरमध्ये अफगाणिस्तान आणि पाकिस्तान येथील आतंकवादी कारवाया करतील, याची चिंता करण्याची आवश्यकता नाही ! – लेफ्टनंट जनरल डी.पी. पांडे

लेफ्टनंट जनरल डी.पी. पांडे

नवी देहली – काश्मीरमध्ये अफगाणिस्तान आणि पाकिस्तान येथील आतंकवादी येऊन कारवाई करतील, याविषयी चिंता करण्याची आवश्यकता नाही, असे काश्मीरमधील सैन्याचे प्रमुख कमांडर लेफ्टनंट जनरल डी.पी. पांडे यांनी सांगितले.

लेफ्ट. जनरल डी.पी. पांडे म्हणाले की, फेब्रुवारीपासून काश्मीरच्या खोर्‍यात सीमेपलीकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन झालेले नाही. या वर्षभरात आतंकवाद्यांनी घुसखोरीचे केवळ दोनच प्रयत्न यशस्वी झाले आहेत. यामध्ये एक सैनिक घायाळ झाला होता. सीमेपलीकडून कोणतीही हालचाल झाल्यास आम्ही त्यांना योग्य प्रत्युत्तर देण्यासाठी सज्ज आहोत.

डावपेचांत हुशार असलेले पाकिस्तानी आतंकवादी !

काश्मीर खोर्‍यात सध्या ६० ते ७० पाकिस्तानी आतंकवादी आहेत. त्यांचा हेतू स्थानिक तरुणांना हातात शस्त्र देऊन आक्रमणासाठी प्रेरित करणे हा आहे, जेणेकरून ते चकमकीत मारले जातील आणि स्वतः मात्र सुरक्षित रहातील. जेव्हा काश्मीरमधील एक तरुण मुलगा मारला जातो, तेव्हा त्याचा आतंकवाद्यांना एक प्रकारे लाभच होतो; कारण ‘भारतीय सैन्य त्याला मारते; म्हणून तरुणांच्या कुटुंबियांचा आमच्यावर राग असतो’, असे पांडे यांनी सांगितले.