कॅप्टन अमरिंदर सिंह यांची अनेक अयोग्य कामे मला ठाऊक आहेत; मात्र मी ती सांगणार नाही ! – पंजाबचे माजी पोलीस महासंचालक महंमद मुस्तफा

जर कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी अयोग्य कामे केली आहेत आणि ती मुस्तफा सांगत नसतील, तर मुस्तफा यांच्यावर कारवाई करून त्यांच्याकडून ती वदवून घ्यायला हवीत. कॅप्टन सिंह मुख्यमंत्रीपदी होते आणि त्यामुळे राज्य अन् देश यांच्या संदर्भात जर कुठले अयोग्य काम त्यांनी केले असेल आणि मुस्तफा यांनी ते जाणीवपूर्वक दडपले असेल, तर दोघांवर कारवाई झाली पाहिजे ! – संपादक

डावीकडून माजी पोलीस महासंचालक महंमद मुस्तफा आणि माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह

जालंधर (पंजाब) – माझ्याकडे तुम्ही केलेल्या अयोग्य कामांची मोठी सूची आहे;  मात्र मी त्याविषयी राहुल गांधी यांना अद्याप सांगितलेले नाही; कारण मी तुम्हाला वचन दिले होते, असे ट्वीट पंजाबचे माजी पोलीस महासंचालक आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंह सिद्धू यांचे सल्लागार महंमद मुस्तफा यांनी पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांना उद्देशून केले आहे. कॅप्टन सिंह यांनी त्यांच्या पदाचे त्यागपत्र दिल्यावर नवज्योतसिंह सिद्धू यांच्यावर टीका करतांना ‘सिद्धू यांचे पाकचे पंतप्रधान इम्रान खान आणि सैन्यदलप्रमुख बाजवा यांच्याशी मैत्री आहे. त्यांना मुख्यमंत्री केल्यास भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने ते घातक ठरू शकते’, असा आरोप केला होता. यावर मुस्तफा यांनी प्रत्युत्तर देतांना वरील ट्वीट केले.

महंमद मुस्तफा यांनी कॅप्टन सिंह यांच्यावर आरोप केला की, तुम्ही १४ वर्षे पत्रकार असलेल्या आय.एस्.आय.च्या महिला हस्तकास रहात होता. (जर अमरिंदर सिंह १४ वर्षे पाकच्या हस्तकासमेवत रहात होते आणि ते मुस्तफा यांना ठाऊक असूनही त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही, तर या दोघांवर देशद्रोहाच्या अंतर्गत कारवाई झाली पाहिजे ! – संपादक) या महिलेने पंजाब सरकारच्या कामकाजात अनेकदा हस्तक्षेप केला होता. माझे तोंड उघडण्यास लावू नका, अशी धमकीही त्यांनी दिली आहे. (अशा प्रकारची धमकी देऊन अयोग्य कृती दडपणार्‍या माजी पोलीस अधिकार्‍याला कारागृहात डांबले पाहिजे ! – संपादक)