गुरुदेवांची कृपा आणि ६८ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. मनीषा पाठक यांचे मार्गदर्शन यांमुळे अनुभवत असलेला अंतर्बाह्य पालट !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांची अगाध कृपा आणि सौ. मनीषाताईचे मार्गदर्शन यांमुळे माझ्यात जाणवलेले पालट येथे दिले आहेत.

सौ. मनीषा पाठक

१. स्वभावदोष आणि ते दूर होण्यासाठी केलेले प्रयत्न अन् त्यात सौ. मनीषा पाठक यांचे लाभलेले साहाय्य !

१ अ. ‘अव्यवस्थितपणा’ हा स्वभावदोष दूर होण्यासाठी प्रयत्न करणे : दळणवळण बंदीच्या आरंभी मनीषाताईने मला सांगितले, ‘‘प्रीती, आता तरी तुला प्रयत्न करायलाच हवेत. ‘किती दिवस माझे असेच असते’, असे म्हणत रहाणार ?’’ तिने मला ‘अव्यवस्थितपणा आणि उतावळेपणा या स्वभावदोषांवर मात करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत’, हे स्पष्टपणे सांगितले आणि ‘ते कसे करायचे ?’, त्याविषयी सूत्रेही सांगितली. तिने ‘मी प्रयत्न करत आहे ना ?’, याचा आढावाही घेतला. तिच्या तळमळीमुळे आणि गुरुदेवांच्या कृपेमुळे ‘अव्यवस्थितपणा’ या स्वभावदोषावर मात करण्याचे माझ्याकडून प्रयत्न झाले.

१ आ. सूत्रांच्या नोंदी करून बोलल्याने ‘उतावळेपणा’ हा स्वभावदोष उणावणे : पूर्वी माझा उतावळेपणाने बोलण्याचा आणि घाई गडबडीत सांगण्याचा भाग व्हायचा. ताईने मला त्याची जाणीव करून दिली. त्यानंतर मी सूत्रांच्या नोंदी करून बोलणे चालू केल्याने माझे बोलणे सूत्रबद्ध होऊ लागले. त्यामुळे माझे अनावश्यक बोलणे न्यून झाले आणि मला स्थिर राहून शांतपणे बोलता येऊ लागले.

सौ. प्रीती कुलकर्णी

१ इ. कुटुंबीय आणि साधक यांच्याकडून अपेक्षा करण्याऐवजी त्यांना समजून घेण्याचे प्रमाण वाढणे : पूर्वी ‘यजमान आणि मुलगी संजना यांनी साधना करायलाच हवी’, अशी माझी तीव्र अपेक्षा असायची. आता मी त्यांना प्रेमाने सांगते. साधकांकडून सूत्र पूर्ण झाले नाही, तर आधी माझ्या अपेक्षा असायच्या. आता त्यांना समजून घेण्याचा भाग वाढला आहे. त्यामुळे मला सकारात्मक आणि उपायात्मक स्थितीत रहाता येते.

१ ई. स्वयंसूचना घेतल्यावर परिस्थिती स्वीकारता येणे : मनीषाताईने २ मासांपूर्वी मला ‘परिस्थितीचा स्वीकार न करणे’ या अहंच्या पैलूंवर प्रयत्न करायला सांगितले. त्या पूर्वी ‘मी सगळे स्वीकारते’, असे मला वाटायचे. ताईने सांगितल्यापासून आणि स्वयंसूचना घ्यायला लागल्यापासून गुरुदेवांनी (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी) ‘मी कुठे कुठे प्रसंग किंवा परिस्थिती स्वीकारत नाही’, याची जाणीव करून दिली अन् त्यावर मात करून परिस्थिती स्वीकारायला ते शिकवत आहेत.

१ उ. गुरुदेवांना अपेक्षित असे बोलणे आणि वागणे करण्याचा प्रयत्न केल्यामुळे नमते घेण्यातील आनंद मिळणे : ताई नेहमी सत्संग आणि व्यष्टी साधनेचा आढावा यांत सांगते, ‘‘आपले वागणे आणि बोलणे गुरुदेवांना अपेक्षित असेच असायला हवे. आपण नेहमी नमते घ्यायला हवे. आपल्याला न्यूनता (कमीपणा) घेता यायला हवी. आपल्याला काही गोष्टी सोडून देता आल्या पाहिजेत.’’ गुरुदेवा, ‘आपल्याला मी कसे वागणे, बोलणे अपेक्षित आहे’, असा विचार आपणच करवून घेता आणि योग्य कृतीही आपणच करवून घेता. त्यामुळे मला नमते घेण्यातील आनंदही मिळत आहे.

१ ऊ. सत्संगाच्या सेवेचे दायित्व आल्यावर ताण येणे आणि नंतर स्वयंसूचना सत्रे केल्यावर ताण उणावून स्थिरता अनुभवणे : मनीषाताईने एका सत्संगाच्या सेवेचे दायित्व दिले आणि ‘तू ते करू शकतेस’, असे सांगून मला आधारही दिला. माझ्यातील कर्तेपणामुळे मला सत्संग घेण्याचा ताण यायचा. त्यामुळे माझे मन अस्थिर व्हायचे. तेव्हा ताईने मला ‘प्रसंगाचा सराव करणे (अ ३)’ या स्वयंसूचना पद्धतीने सूचना सत्रे घ्यायला सांगितली. मी तसे केल्यापासून माझा ताण उणावून मला बर्‍याच प्रमाणात स्थिरता अनुभवता आली.

२. गुरुदेव करत असलेल्या अपार कृपेमुळे त्यांच्या चरणी व्यक्त केलेली कृतज्ञता

गुरुदेवा, आता मला आपत्काळाविषयी स्वत:ची किंवा कुटुंबियांची काळजी याचे काहीच वाटत नाही किंवा त्याचा ताणही येत नाही. ही केवळ आपलीच कृपा आहे. गुरुदेवा, या कालावधीत मला आपले अस्तित्व सतत अनुभवता येते. माझ्यासमोर आपण आसंदीवर आसनस्थ असलेले दिसता. ‘आपण या क्षूद्र जिवाच्या हृदयात विराजमान आहात’, हेही मला अनुभवता येते. गुरुदेवा, आपण या लेकराला अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपत आहात. आपणच मला शारीरिक त्रासातही स्थिर आणि आनंदी ठेवत आहात. ‘परम पूज्य, मी सर्वस्वी आपलीच होते, आपलीच आहे आणि मला आपलेच होऊन रहायचे आहे. परम पूज्य, मला तुमच्या चरणी घ्याल ना ? मला आता अन्य काही नको.’

‘हे गुरुमाऊली, गेल्या २० वर्षांत माझ्याकडून आपल्याला अपेक्षित असे प्रयत्न झाले नाहीत. त्याची खंत माझ्या अंतर्मनाला आहे. या दळणवळण बंदीच्या कालावधीत आपली कृपा आणि मनीषाताईचे मार्गदर्शन यांमुळे मी हा पालट अनुभवू शकले. यामध्ये माझे प्रयत्न काहीच नाहीत. गुरुदेवा, आपणच माझ्यात पालट घडवत आहात आणि मी केवळ अनुभवत आहे.’

– सौ. प्रीती कुलकर्णी, कोथरूड, पुणे (४.३.२०२१)

परम पूज्यच जिचे आराध्य ।

मला माझी आध्यात्मिक सखी सौ. मनीषा पाठक यांच्याविषयी म्हणावेसे वाटते,

परम पूज्य जिचा श्वास ।
परम पूज्य जिचा उच्छवास ।। १ ।।

परम पूज्य जिचा आरंभ ।
परम पूज्य जिचा मध्य ।
परम पूज्य जिचा शेवट ।। २ ।।

परम पूज्य जिच्या ध्यानी-मनी-स्वप्नी ।
परम पूज्यच जिची सेवा ।
परम पूज्यच जिचे जीवन ।। ३ ।।

परम पूज्यच जिचे सर्वस्व ।
परम पूज्यच जिचा प्राण ।
परम पूज्यच जिचे आराध्य ।
परम पूज्यच जिचे माता, पिता, सखा, बंधू ।। ४ ।।

अशा परम पूज्यमय असलेल्या माझ्या आध्यात्मिक सखीचे कितीही गुणगान केले, तरी अल्पच आहे. माझ्या प्रिय कृष्णसखीसाठी मी आपल्या पावन चरणी आर्त प्रार्थना करते, ‘तिची लवकरात लवकर आध्यात्मिक उन्नती होऊन ती संतपदी विराजमान होवो आणि तिचे गुण माझ्यात येवोत.’ गुरुमाऊली, मला अशी आध्यात्मिक सखी दिल्यामुळे मी आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’

– सौ. प्रीती कुलकर्णी, कोथरूड, पुणे (४.३.२०२१)

या कवितेत प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक