हिंदूसंघटन आणि धर्माधिष्ठित हिंदू राष्ट्राची स्थापना यांसाठी हिंदू जनजागृती समिती
‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ परिषदेमध्ये हिंदुविरोधी प्रचार !’ या विषयावर आयोजित विशेष संवाद !
मुंबई – अमेरिकेत आयोजित केलेल्या ‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ या परिषदेमध्ये तथाकथित अभ्यासकांनी हिंदु धर्मातील वर्ण, जातीव्यवस्था आदींविषयी संभ्रमाचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला. धर्मांतराच्या हेतूने ब्रिटीश मिशनर्यांनी भारतात ब्राह्मणवादाला जन्म दिला आणि त्याला पुढे नेण्याचे काम अशा हिंदुविरोधी परिषदा करत आहेत. ही परिषद आयोजित करण्यापूर्वी आयोजकांनी हिंदु धर्माविषयी विविध भ्रम पसरवून वारंवार स्वतःच्या भूमिका पालटल्या. अशी खोटी माहिती पसरवणार्यांवर विश्वास न ठेवता जगभरातील हिंदु बांधवांनी हिंदु धर्माचा प्रसार मोठ्या प्रमाणात करायला हवा. जगभरातील हिंदूंनी हिंदु धर्माची योग्य तात्त्विक भूमिका मांडल्यामुळे, तसेच हिंदूंचा सहस्रो वर्षांचा मानवतेचा आणि विश्वाला पूरक असा इतिहास समाजाला सांगितल्यामुळे अमेरिकेतील ही परिषद अयशस्वी झाली, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्र्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित ‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ परिषदेमध्ये हिंदुविरोधी प्रचार !’ या ‘ऑनलाईन’ विशेष संवादात ते बोलत होते.
या विशेष संवादामध्ये ‘इशित्व फाऊंडेशन’च्या संचालिका आरती अगरवाल, मनोचिकित्सक आणि लेखक डॉ. रजत मित्रा अन् ऑस्ट्रेलिया येथील विचारवंत डॉ. यदु सिंह यांनी सहभाग घेतला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री कार्तिक साळुंके आणि मिलिंद धर्माधिकारी यांनी केले. या कार्यक्रमाचे थेट प्रसारण १ सहस्र ८०० हून अधिक जणांनी पाहिले.
हिंदुविरोधी परिषदेतून ‘हिंदुत्वा’चे चुकीचे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न ! – आरती अगरवाल, संचालिका, इशित्व फाऊंडेशन
या हिंदुविरोधी परिषदेतून ‘हिंदुत्वा’चे असे चुकीचे चित्र निर्माण करायचे होते की, हिंदूंचा इतिहासातील नरसंहार योग्यच होता, तसेच पुढे होणारा नरसंहारही योग्यच असेल. सध्या पाकिस्तान आणि बांगलादेश यांमध्ये हिंदु युवतींवर अत्याचार होत आहेत. हिंदूंची गावे, वस्त्या जाळल्या जात आहेत. हिंदूंना कितीही लक्ष्य केले, तरी मानवाधिकारवाले त्याकडे लक्ष देणार नाहीत, अशी स्थिती यांना निर्माण करायची आहे.
हिंदूंच्या शौर्यजागृती करणार्या इतिहासाची शिकवण हिंदु युवा पिढीला देणे आवश्यक ! – डॉ. रजत मित्रा, मनोचिकित्सक आणि लेखक
या हिंदुविरोधी परिषदेमधून केवळ हिंदुविरोधी चुकीची बाजू मांडून ते वास्तव म्हणून पुढे रेटण्याचा प्रयत्न केला गेला. वेगवेगळ्या विद्यापिठांनी एकत्र येऊन हिंदु धर्माला एक धोका मानून हिंदूंचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. विदेशात आपले अनेक हिंदु युवा शिक्षण घेत आहेत. ‘हिंदूंनी संघर्ष करून विविध आक्रमणांपासून हिंदु धर्माला कसे वाचवले’, या इतिहासाची व्यापक स्वरूपात शिकवण हिंदु युवा पिढीला दिली पाहिजे, तसेच हिंदु धर्माप्रती आपल्या कर्तव्याची जाणीव करून दिली पाहिजे.
जगभरातील हिंदूंच्या संघटित प्रतिकारामुळे हिंदुविरोधी परिषद अयशस्वी ! – डॉ. यदु सिंह, विचारवंत, ऑस्ट्रेलिया
‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ या परिषदेचे आयोजक आणि वक्ते हे केवळ हिंदु धर्मविरोधी नाही, तर नक्षलवाद्यांना पाठिंबा देणारे, भारतीय सैन्याच्या विरोधात बोलणारे देशविरोधी आहेत. या परिषदेला जगभरातील हिंदूंनी सामाजिक माध्यमांसह (सोशल मिडियासह) अन्य माध्यमांतून संघटितपणे प्रतिकार केल्यामुळे त्यांचा उद्देश यशस्वी झाला नाही.