अयोध्येतील श्रीराममंदिराचा पाया सिद्ध !

श्रीराममंदिराची प्रतिकृती

अयोध्या (उत्तरप्रदेश) – अयोध्येतील श्रीरामजन्मभूमीवरील श्रीराममंदिर उभारण्याचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. श्रीराममंदिराचा पाया सिद्ध झाला आहे. मंदिराचा दुसरा टप्पा २ मासांत पूर्ण केला जाईल, अशी माहिती श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव चंपत राय यांनी दिली.
चंपत राय यांनी सांगितले की, श्रीराममंदिर ३६० फूट लांब, २३५ फूट रुंद आणि १६१ फूट उंच असेल. मंदिर ३ मजली असेल. तळ मजल्यावर १६०, पहिल्या मजल्यावर १३२ आणि दुसर्‍या मजल्यावर ७४ खांब असतील. मंदिराला एक मुख्य शिखर असून ५ उप शिखरे आणि तितकेच मंडप असतील. यासमवेतच एका मुख्य द्वारासह ११ उपद्वार असतील. मंदिर पूर्ण उभारल्यानंतर २.७५ एकर तथा मंदिराचा संपूर्ण परिसर ६.५ एकराचा होईल. श्रीरामजन्मभूमी न्यासाकडे अनुमाने १०० एकराचा परिसर आहे. देशभरातील श्रीरामभक्तांनी मंदिर उभारणीसाठी अनुमाने ४ सहस्र कोटी रुपये दान दिले आहेत. यात प्रतिमहा १५ लाख रुपयांची भर पडत आहे.