भारतातील तिसर्‍या इयत्तेतील ७५ टक्के मुलांना बेरीज आणि वजाबाकी येत नाही !

देशातील प्राथमिक शिक्षणाच्या गुणवत्तेची विदारक स्थिती !

‘जागतिक बँकेच्या अहवालातील माहितीनुसार भारतासहित १२ देशांतील तिसर्‍या इयत्तेत शिकत असलेल्या मुलांना साधी वजाबाकीसुद्धा येत नाही. यामध्ये भारताचा दुसरा क्रमांक आहे. भारतातील तिसर्‍या इयत्तेतील ७५ टक्के मुलांना बेरीज आणि वजाबाकी येत नाही. इतकेच नव्हे, तर दुसर्‍या इयत्तेतील मुलांना साधे एक वाक्यसुद्धा वाचता येत नाही. ‘शैक्षणिक गुणवत्ता ढासळणे, हा मुलांवर अन्याय आहे’, असेही या अहवालात म्हटले आहे. भारतातील ग्रामीण भागातील शाळेत शिकणार्‍या ७५ टक्के मुलांना २ संख्यांची वजाबाकी करण्यास सांगितले असता या मुलांना हे उदाहरण सोडवता आले नाही. ५ व्या इयत्तेच्या विद्यार्थ्यांचीही अशीच स्थिती आहे. यासाठी जगातील सर्वच देशांनी प्राथमिक शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्याची आवश्यकता आहे.

आजकालच्या बहुतेक शिक्षकांचे लक्ष विद्यार्थ्यांची उपस्थिती आणि वेतन यांवर असते, तर आई-वडील ‘मुलांना शाळेत प्रवेश मिळवून देणे आणि शुल्क भरले की, आपले कर्तव्य संपले’, असे समजतात. आपला मुलगा किंवा मुलगी शाळेत जातात कि नाही ? वर्गात सर्व तासिकांना पूर्णवेळ बसतात का ? घरी गृहपाठ करतात कि भ्रमणभाषवर व्यस्त असतात ? हे पहाण्याची त्यांना आवश्यकता वाटत नाही किंवा वेळ नसतो, असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.’

(देशातील शिक्षणाची ही विदारक स्थिती असून ती पालटल्याविना देशाची युवा पिढी सक्षम कशी  होणार ? जर युवा पिढी सर्वार्थाने सक्षम झाली, तर भारत महासत्ता होऊ शकतो. ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्र अपरिहार्य ! – संपादक)