देशाला स्वातंत्र्य मिळून ७४ वर्षे उलटूनही नागरिक अजूनही मूलभूत सुविधांपासून वंचित ! – पी.एस्. श्रीधरन् पिल्लई, राज्यपाल

राज्यपालांनी सांगितलेली ही स्थिती आतापर्यंतच्या सर्व शासनकर्त्यांना लज्जास्पद ! – संपादक

गोव्याचे राज्यपाल पी.एस्. श्रीधरन् पिल्लई

पणजी, १८ सप्टेंबर (वार्ता.) – देशाला स्वातंत्र्य मिळून आता ७४ वर्षे उलटली आहेत, तरीही देश नागरिकांना मूलभूत सुविधा पुरवू शकलेला नाही. ही त्रुटी दूर करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी नियोजनबद्धरित्या प्रयत्न करत आहेत, असे प्रतिपादन गोव्याचे राज्यपाल पी.एस्. श्रीधरन् पिल्लई यांनी केले. कदंब पठारावर आयोजित केलेल्या एका खासगी कार्यक्रमात राज्यपाल पी.एस्. श्रीधरन् पिल्लई बोलत होते.

ते पुढे म्हणाले, ‘‘देशात हिंदू, ख्रिस्ती, मुसलमान आदी विविध धर्मांचे, तसेच भाषा, जीवनपद्धत, कपडे आणि खाण्याच्या पद्धती यांमध्ये भिन्नता असलेले लोक रहातात; मात्र तरीही सर्वजण एकसंघ होऊन रहात आहेत. (हिंदू सहिष्णु असल्याने जेथे हिंदू बहुसंख्येने आहेत, तेथे एकसंघता टिकून आहे. ज्या ठिकाणी अन्य धर्मीय बहुसंख्येने आहेत, तेथे एकसंघता राहिलेली नसून धर्मांधता फोफावली आहे, हे सत्य जाणावे ! – संपादक) धर्म, भाषा आणि प्रांत भारताला एकसंघ ठेवू शकत नाही. (भारत हिंदु राष्ट्र झाल्यास सर्व धर्मियांना एकसंघ ठेवणे शक्य आहे ! – संपादक) देशात लोकशाही आणि सार्वभौमत्व यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे अन् यामुळे मतभिन्नता असूनही सर्वजण एकसंघतेने रहातात. देशातील प्रत्येक नागरिकाला अन्न, निवारा आणि आरोग्य या मूलभूत सुविधा मिळाल्या पाहिजेत; मात्र देशाला स्वातंत्र्य मिळून आता ७४ वर्षांचा कालावधी उलटूनही नागरिकांना मूलभूत सुविधा मिळू शकलेल्या नाहीत.’’