निपाणी (जिल्हा बेळगाव) येथील नागरिकांनी श्री गणेशमूर्ती दानाकडे पाठ फिरवली !

प्रतिकात्मक छायाचित्र

निपाणी (जिल्हा बेळगाव), १८ सप्टेंबर – येथे ५ दिवसांच्या घरगुती श्री गणेशमूर्तींचे विसर्जन निपाणी शहर आणि परिसर येथे पार पडले. या वेळी भाविकांनी श्री गणेशमूर्ती पाण्यात विसर्जन करण्याऐवजी कृत्रिम कुंडात विसर्जन करावी, असे आवाहन नगरपालिकेने केले होते. त्यासाठी पालिकेने ५ ठिकाणी कृत्रिम विसर्जन कुंडांची व्यवस्था केली होती; मात्र याकडे नागरिकांनी पाठ फिरवल्याचे दिसून आले. पालिकेने उभारलेले कृत्रिम कुंड, तसेच बॅरलमध्ये केवळ ४ मूर्तींचे विसर्जन झाले. त्यामुळे पालिकेच्या या नियोजनाचा फज्जा उडाला.

मागील वर्षी पालिका प्रशासनाने श्री गणेशमूर्ती दान उपक्रम राबवला होता. त्या वेळी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात श्री गणेशमूर्ती दान केल्या होत्या; मात्र पालिका प्रशासनाने श्री गणेशमूर्ती कचरा गाडीतून नेऊन पट्टरकुडी परिसरातील कचरा डेपोमध्ये ठेवल्या होत्या. मूर्तींची ही एकप्रकारे विटंबनाच असल्याचा आरोप करत भाविक आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी तीव्र संताप व्यक्त केला होता. त्यामुळे यंदा नागरिकांनी नगरपालिकेच्या मूर्ती विसर्जनाच्या नियोजनाला प्रतिसाद दिला नसल्याचे दिसून आले.

गणेशभक्तांच्या भावना दुखावल्याने त्यांनी श्री गणेशमूर्ती वहात्या पाण्यात विसर्जन केल्या ! – अमोल चेंडके, सचिव, श्रीराम सेना

गेल्या वर्षी नगरपालिका प्रशासनाने श्री गणेशमूर्तींची विटंबना केली होती. त्यामुळे गणेशभक्तांच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या. शास्त्रोक्त पद्धतीने वहात्या पाण्यात श्री गणेशमूर्तींचे विसर्जन व्हावे यासाठी श्रीराम सेना, तसेच अन्य संघटनांच्या वतीने जनजागृती करण्यात आली होती. त्याला नागरिकांनी प्रतिसाद देत वहात्या पाण्यात श्री गणेशमूर्तींचे विसर्जन केले, असे श्रीराम सेनेचे सचिव श्री. अमोल चेंडके यांनी सांगितले.