मुंबई, १६ सप्टेंबर (वार्ता.) – आंध्रप्रदेश सरकारने देशातील सर्वांत श्रीमंत देवस्थान म्हणून ओळखल्या जाणार्या ‘तिरुमला तिरुपती देवस्थानम् ट्रस्ट’च्या नव्या मंडळाची स्थापना केली आहे. यामध्ये एकूण २८ सदस्यांचा समावेश आहे. राज्य सरकारकडून या सदस्यांची सूची घोषित करण्यात आली आहे. यामध्ये शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांची न्यासाच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्याशी संवाद साधून मिलिंद नार्वेकर यांच्या नावाची शिफारस केल्याची माहिती आहे. मिलिंद नार्वेकर यांच्याकडे मुंबई क्रिकेट संघटनेच्या ‘मुंबई प्रीमिअर लीग (एम्.पी.एल्.) गव्हर्निंग कौन्सिल’च्या अध्यक्षपदाचे दायित्वही आहे. मिलिंद नार्वेकर हे उद्धव ठाकरे यांचे विश्वासू सहकारी आहेत. गटप्रमुख, उद्धव ठाकरे यांचे सचिव आणि आता शिवसेना सचिव असा मिलिंद नार्वेकर यांचा राजकीय प्रवास आहे.