सिंधुदुर्ग – कोरोना महामारीच्या कालावधीत ‘कोरोना योद्धा’ म्हणून काम केलेल्या आरोग्य कर्मचार्यांना शासनाने कामावरून काढले आहे. या कर्मचार्यांनी शासकीय सेवेत कायमस्वरूपी नियुक्ती मिळावी, यासाठी १५ सप्टेंबर या दिवशी जिल्हा परिषद मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन केले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढल्यानंतर शासनाने विविध ठिकाणी ‘कोविड केअर सेंटर’ निर्माण केली. या केंद्रांत काम करणार्या आरोग्य कर्मचार्यांना ‘कोरोना योद्धा’ म्हणून नियुक्ती देण्यात आली होती. या कालावधीत कोरोनाची भीती न बाळगता जिल्ह्यातील २७२ कर्मचार्यांनी अविरतपणे काम केले आहे. यामध्ये स्टाफ नर्स, डाटा एन्ट्री ऑपरेटर, लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट अशा विविध पदांवर सर्वजण कार्यरत होते; परंतु कोणतीही पूर्वसूचना न देता ३१ ऑगस्ट २०२१ पासून शासनाने काम बंद करण्याचे आदेश या कर्मचार्यांना दिले. त्यामुळे अचानक कामावरून काढल्याने आमच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे, असे या आंदोलनकर्त्यांनी सांगितले.
यामध्ये अमित वजराटकर, प्राजक्ता माळवदे, सुमेधा गावकर, रेश्मा नायर, हार्दिक कदम, सुशांत धुरी, गिरिधर कदम, प्रमोद कलींगण, लक्ष्मण वरवडेकर आदी कर्मचारी सहभागी झाले होते.
या आंदोलनकर्त्यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी भेट घेतली अन् चर्चा केली. या वेळी सामंत म्हणाले, ‘‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कर्मचार्यांच्या भूमिकेशी सहमत आहे. या कर्मचार्यांच्या मागणीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे लक्ष वेधून कर्मचार्यांना न्याय मिळावा, यासाठी प्रयत्न करणार आहोत.’’