फोंडा, १५ सप्टेंबर (वार्ता.) – वर्ष १९७१ मध्ये भारताने पाकवर मिळवलेल्या विजयाचा ५० वा वर्धापनदिन १५ सप्टेंबर २०२१ या दिवशी भारतीय सेनेकडून फोंडा येथील क्रांती मैदानात साजरा करण्यात आला. वर्ष १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धातील विजयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या विजय ज्योतीचे १५ सप्टेंबरला फोंडा येथे क्रांती मैदानात सेनेने स्वागत केले. कुर्टी, फोंडा येथील ६ टेक्निकल ट्रेनिंग रेजिमेंट (६ टीटीआर्) कॅम्पमधील अधिकार्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या वेळी सैन्यातील अधिकार्यांसह गोव्याचे कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे उपस्थित होते.
या कार्यक्रमात वीरगती प्राप्त झालेल्या विरांना मंत्री गोविंद गावडे यांनी पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली अर्पण केली. या वेळी मंत्री गोविंद गावडे यांनी सैन्यातील लोकांना पाठिंबा देण्यासाठी जनतेने पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. या कार्यक्रमाला लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विजय ज्योतीच्या स्वागताचा फोंडा येथील कार्यक्रम हा राज्यातील शेवटचा कार्यक्रम होता आणि ही विजय ज्योत १६ सप्टेंबरला दुसर्या राज्यात जाणार आहे.