विकासाच्या प्रक्रियेत पर्यावरणाचा विचार न केल्यास विनाश अटळ ! – सुरेश प्रभु, माजी केंद्रीय मंत्री

सुरेश प्रभु, माजी केंद्रीय मंत्री

मालवण – भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर हवामानात सातत्याने होणारे पालट, ही धोक्याची घंटा आहे. विकास प्रक्रियेत पर्यावरणाचा विचार न झाल्यास विनाश होऊ शकतो. याचा सर्वाधिक फटका किनारपट्टीवरील लोकांना बसेल, अशी भीती माजी केंद्रीय मंत्री तथा भाजपचे खासदार सुरेश प्रभु यांनी व्यक्त केली.
गणेशोत्सवासाठी खासदार प्रभु शहरातील मेढा येथील त्यांच्या मूळ निवासस्थानी आले होते. या वेळी पत्रकारांना खासदार प्रभु म्हणाले, ‘‘सातत्याने पश्चिम किनारपट्टीवर येणार्‍या वादळांचा परिणाम मासेमारीसह शेती आणि बागायती यांच्यावरही होत आहे. पर्यावरणातील पालटांचा पर्यटनावरही परिणाम होत असेल, तर त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनांनी तात्काळ कृती करायला हवी. सद्य:स्थितीत या वादळांचे कोकणावर सावट आहे. पर्यावरणाशी सुसंगत मासेमारी, सेंद्रीय पद्धतीने शेती करायला हवी. वादळामुळे सातत्याने होणारी हानी लक्षात घेता शासानाने अर्थसंकल्पात तरतूद करायला हवी.’’