|
धारूर (जिल्हा बीड) – धारूर ग्रामपंचायतने सार्वजनिक पाणी दुरुस्ती आणि अन्य कामे पुरवठा योजनेतून केल्याचे सांगत पैसे उचलले; मात्र प्रत्यक्षात कामे झाली नाहीत. त्यामुळे उचललेल्या पैशांत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार असण्याची शक्यता आहे, असा आरोप उपसरपंच गणेश जगताप यांनी केला होता. याविषयी योग्य चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी २ सप्टेंबर या दिवशी जगताप यांनी निवेदनाद्वारे केली होती. त्यावर प्रशासनाने कोणतीही करवाई केली नाही. त्यामुळे ९ सप्टेंबर या दिवशी जगताप यांनी धाराशिव पंचायत समितीमध्ये डिझेल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला; मात्र आनंदनगर पोलिसांनी जगताप यांना कह्यात घेतले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.
जगताप यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ग्रामपंचायतमध्ये वर्ष २०१८-१९ मध्ये गावाअंतर्गत सार्वजनिक पाणी दुरुस्ती आणि अन्य कामे, पुरवठा योजनेतून केल्याचे सांगत पैसे उचलले; मात्र प्रत्यक्षात कामे झाली नाहीत. मागासवर्गीय वसाहतीमध्ये बोअरवेल मोटरसह पाईपलाईनचे काम, गावाच्या अंतर्गत नवीन पाईप आणि अन्य दुरुस्ती, ग्रामपंचायत कार्यालय इंटेरियर डिझाईन करणे अन् विद्युत् पुरवठा करणे, अंगणवाडीत खेळणी आणि अन्य साहित्य पुरवणे, जिल्हा परिषद शाळेत संगणक अन् अन्य साहित्य पुरवणे, शाळेसाठी डिजिटल क्लासरूम सिद्ध करणे या कामांसाठी लाखो रुपयांची तरतूद होती. हा निधी ग्रामपंचायतकडून उचलण्यात आला; मात्र कामेच केली नाही. तक्रार केल्यानंतर काही कामे करण्यात आली. त्यामुळे उचललेल्या पैशांत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे.