भारताने कधीही आतंकवाद्यांच्या मागण्यांपुढे गुडघे टेकवू नयेत ! – डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी, खासदार, भाजप

डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी (डावीकडे) आपल्या ‘ह्यूमन राइटस अँड टेररिज्म इन इंडिया’ सोबत

नवी देहली – आतंकवाद्यांचे ‘हिंदूंची संस्कृती आणि हिंदूंचे धाडस तोडण्या’चे राजकीय लक्ष्य आहे. त्यांना भारताचा मूलभूत आधार खिळखिळा करायचा आहे. त्यामुळे भारताने कधीही आतंकवाद्यांच्या मागण्यांपुढे गुडघे टेकवू नयेत, असे प्रतिपादन भाजपचे नेते आणि खासदार डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी त्यांच्या नव्या पुस्तकातून केले आहे. ‘ह्यूमन राइटस अँड टेररिज्म इन इंडिया’ (भारतातील मानवाधिकार आणि आतंकवाद) असे या पुस्तकाचे नाव आहे. या पुस्तकात डॉ. स्वामी यांनी आतंकवादाचा सामना करण्यासाठी योग्य उपाययोजनांसह मानवीय आणि मूलभूत अधिकार यांचे सामंजस्य कसे ठेवले पाहिजे, यांविषयी माहिती दिली आहे. ‘वर्ष १९९९ मध्ये आतंकवाद्यांनी इंडियन एअरलाईन्सचे अपहरण करून कंधारला नेऊन प्रवाशांच्या सुटकेच्या बदल्यात ५ आतंकवाद्यांना सोडण्याच्या मागणीपुढे भारताने पत्करलेली शरणागती वाईट होती’, असेही डॉ. स्वामी यांनी त्यांच्या पुस्तकात नमूद केले आहे.

डॉ. स्वामी यांनी पुढे लिहिले आहे की, आज भारत देश पाकिस्तान, तालिबान नियंत्रित अफगाणिस्तान, इस्लामिक स्टेट आणि अन्य आतंकवादी संघटना, तसेच चीनचे समर्थन असणार्‍या पूर्वेकडील आतंकवादी यांनी घेरलेला आहे. आपल्याला तुकड्या तुकड्यांमध्ये नाही, तर पूर्ण क्षमतेने आणि प्रभावाने यावर उपाय काढण्याची आवश्यकता आहे. यापूर्वी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष स्वरूपामध्ये अशा विध्वंसकारी शक्तींनी भारताला धोका निर्माण केला नव्हता आणि हिंसेद्वारे भारतातील शांतीप्रिय जनतेला भयभीत केले नव्हते.