खासगी रुग्णालयांना वारंवार नियमांची आठवण का करून द्यावी लागते ? नियमांचे उल्लंघन करणार्यांना कारवाईचीच भाषा समजते, हे प्रशासनाने लक्षात घ्यायला हवे !
पुणे, १० सप्टेंबर – धर्मादाय आयुक्तालयाकडून सवलती घेणार्या खासगी रुग्णालयांनी गरिबांना विनामूल्य, मध्यमवर्गीयांना माफक दरात सुविधा देणे बंधनकारक आहे. नोंद असलेल्या रुग्णालयांनी शासकीय योजनांचे लाभ रुग्णांना देणे आवश्यक आहे. हे लाभ देण्यास टाळाटाळ करणार्या रुग्णालयांवर कडक कारवाई करण्याची चेतावणी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली आहे. कोरोना सद्य:स्थितीचा आढावा घेण्यासाठी प्रत्येक आठवड्याला होणार्या बैठकीत लोकप्रतिनिधींनीही याविषयी तक्रारी केल्या होत्या. या पार्श्वभूमीवर डॉ. देशमुख यांनी धर्मादायकडे नोंद असलेल्या खासगी रुग्णालयांची बैठक घेतली होती.
डॉ. देशमुख यांनी सांगितले की, या रुग्णालयांचे लेखा परीक्षण वेळेवर होणे आवश्यक आहे. या रुग्णालयांवर तातडीने समिती नियुक्त करून तक्रारी निकालात काढण्यात येतील. संबंधित रुग्णालयांनी गरीब, मध्यमवर्गीयांना देण्यात येणार्या सेवांची माहिती देणारे फलक रुग्णालयात दर्शनी भागात लावणे आवश्यक आहे.