पणजी, ८ सप्टेंबर (वार्ता.) – कोरोना प्रतिबंधक लसीच्या दोन्ही मात्रा (डोस) घेतलेल्यांना राज्यात कोरोनाबाधित नसल्याच्या प्रमाणपत्राविना प्रवेश देण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाने शासनाला अनुमती दिली आहे. यामुळे कोरोना प्रतिबंधक लसीची दुसरी मात्रा (डोस) घेऊन १४ दिवस उलटल्यानंतर ‘आर्.टी.पी.सी.आर्.’ चाचणी किंवा ‘अँटीजन’ या चाचण्या न करता नागरिकांना गोव्यात प्रवेश करता येणार आहे. राज्यशासनाने जुलै मासात गोवा खंडपिठात विनंतीअर्ज करतांना म्हटले होते की, कोरोना महामारीच्या स्थितीत लक्षणीय सुधारणा झालेली आहे. कोरोनाविषयक चाचणीच्या तुलनेत कोरोनाबाधित रुग्ण सापडण्याचे प्रमाण ५ टक्क्यांहून अल्प आहे आणि कोरोनापासून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७ टक्के आहे.