विशाळगडाच्या अतिक्रमणमुक्तीसाठी ठराव करणार्या म्हारूळ आणि साबळेवाडी (जिल्हा कोल्हापूर) येथील ग्रामपंचायतींचे अभिनंदन ! – संपादक
कोल्हापूर, ७ सप्टेंबर (वार्ता.) – विशाळगडाच्या अतिक्रमणमुक्तीसाठी शासनस्तरावर पाठपुरावा करण्यासाठी म्हारूळ आणि साबळेवाडी (जिल्हा कोल्हापूर) येथील ग्रामपंचायतींनी ठराव केले आहेत. म्हारूळ येथील ठराव करण्यासाठी धर्मप्रेमी श्री. अजित पाटील यांनी पुढाकार घेतला, तर साबळेवाडी येथील धर्मप्रेमी श्री. शुभम् वरपे यांनी पुढाकार घेतला. या दोघांना धर्मप्रेमी श्री. राहुल पाटील यांनी विषय सांगितला.
म्हारूळ आणि साबळेवाडी (जिल्हा कोल्हापूर) येथील ग्रामपंचायतींनी केलेला ठराव !
शाहूवाडी तालुक्यातील विशाळगड येथे नरवीर बाजीप्रभु देशपांडे आणि फुलाजीप्रभु देशपांडे यांचे समाधीस्थळ आहे. या ठिकाणी पुरातत्व विभाग आणि प्रशासन यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे अनधिकृत बांधकामे झालेली आहेत. हिंदूंच्या मंदिरांची दुरवस्था, तसेच नरवीरांच्या समाधीस्थळी जाण्यासाठी साधी पायवाटही नाही. याविषयी विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समिती कार्य करत आहेत. या समितीस पूर्ण सहकार्य करण्याचे सभेत ठरले, तसेच अतिक्रमणमुक्तीसाठी शासनाकडे पत्रव्यवहार करण्याचाही निर्णय घेण्यात आला.