देवाच्या अखंड अनुसंधानात असलेले कै. धनराज विभांडिक !

सौ. अश्विनी कार्तिक साळुंके (मुलगी), फोंडा, गोवा.

सौ. अश्विनी साळुंके

१. ‘बाबांचे वागणे, बोलणे आणि रहाणीमान साधे होते.

२. प्रत्येक कृती साधना म्हणून करणे : बाबा घर, कार्यालय किंवा गुरुसेवा यांतील प्रत्येक कृती सेवा म्हणून करायचे. ते प्रत्येक कृती करण्यापूर्वी प्रार्थना आणि कृती झाल्यानंतर कृतज्ञता व्यक्त करायचे. ते आम्हालाही तसे करायला सांगायचे. त्यामुळे त्यांना समाधान आणि आनंद वाटायचा.

३. त्यागी वृत्ती : बाबांना जानेवारी २०१९ पासून ५ – ६ मास वेतन मिळाले नाही. त्यानंतर गुरुपौर्णिमा होती. ‘या गुरुपौर्णिमेला मी परात्पर गुरुदेवांना अर्पण देऊ शकणार नाही’, अशी बाबांना रुखरुख लागली होती. गुरुपौर्णिमा झाल्यानंतर बाबांना त्यांच्या आस्थापनाने वेतन न देता घरखर्चासाठी ५ सहस्र रुपये दिले. त्या वेळी बाबांनी ‘घराचा खर्च कसा होणार ?’, याचा विचार न करता त्यातील ३ सहस्र रुपये अर्पण केले. बाबा आईला म्हणाले, ‘‘नंतर जे वेतन मिळेल, ते घरखर्चासाठी वापरू.’’ बाबांचा त्याग आणि त्यांची परात्पर गुरुदेवांप्रती असलेली श्रद्धा अन् समर्पण बघून कृतज्ञतेने माझी भावजागृती झाली.

४. भावस्थितीत असणे : ‘बाबा नेहमी भावस्थितीत आहेत’, असे जाणवायचे. त्यांच्याशी भ्रमणभाषवर बोलतांना माझी नेहमी भावजागृती होत असे.

५. कृतज्ञताभाव : बाबांचे फुप्फुस २५ ते ३० टक्के निकामी झाले असल्याने त्यांना श्वास घ्यायला खूप त्रास होत होता. त्यांना थकव्यामुळे चालणेही शक्य होत नसे. अशा वेळी कुटुंबातील सदस्य त्यांची सेवा करत असतांना बाबांना त्यांच्याविषयी पुष्कळ कृतज्ञता वाटत असे.

६. वडिलांच्या निधनानंतर ‘ते प.पू. गुरुदेवांच्या चरणांजवळ बसून बोलत आहेत’, असे दिसणे : बाबांचे निधन झाल्यानंतर थोड्या वेळाने मला दिसले, ‘बाबा प.पू. गुरुदेवांच्या खोलीत त्यांच्या चरणांजवळ बसून सर्व सांगत आहेत आणि आता यापुढे ‘मी कसे प्रयत्न करू ? कोणती सेवा करू ?’, असे त्यांना विचारत आहेत.’ हे दृश्य दिसल्यानंतर ‘बाबा प.पू. गुरुदेवांच्या जवळ आहेत, तर त्यांच्या जाण्याचे दुःख का करायचे ?’, असा विचार माझ्या मनात येऊन मी स्थिर झाले.’

श्री. कार्तिक साळुंके (जावई), देहली

श्री. कार्तिक साळुंखे

१. ‘बाबा (सासरे) शांत स्वभावाचे होते. ‘ते इतरांना समजून घ्यायचे. ते सर्वांशी मिळून-मिसळून रहायचे.

२. व्यष्टी साधना नियमित करणे : मी प्रसारसेवेनिमित्त देहली येथे रहात असल्याने मला बाबांचा फारसा सहवास लाभला नाही. एकदा ते गोव्याला आमच्या घरी आले होते. त्या वेळी माझ्या लक्षात आले, ‘बाबा नामजपादी उपाय नियमित करायचे. ते स्वयंसूचनाांची सत्रे वेळेत पूर्ण करायचे. घरी कोणताही कार्यक्रम असला, तरी बाबा त्यांची व्यष्टी साधना वेळेत पूर्ण करत होते.

३. श्वास घेण्यास पुष्कळ त्रास होत असतांनाही सासरे सतत अनुसंधानात असणे : त्यांची फुप्फुसे योग्य प्रकारे काम करत नसल्याने त्यांना श्वास घ्यायला पुष्कळ त्रास होत होता; पण त्या स्थितीतही ते कुटुंबातील व्यक्तींना सांगत होते, ‘तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना करा.’ ते स्वतःही सतत ईश्वराचे स्मरण आणि प्रार्थना करत होते. तेव्हा ‘आध्यात्मिक पातळी चांगली असलेला साधक सतत देवाच्या अनुसंधानात कसा असतो ?’, हे माझ्या लक्षात आले.

४. ‘बाबांना (सासर्‍यांना) चांगली गती मिळाली आहे’, असे जाणवणे : बाबांचा मृत्यू झाल्यावर ‘प्रत्यक्ष देवदूत येऊन त्यांना घेऊन गेले आहेत’, असे मला जाणवत होते. ‘परात्पर गुरुदेवांची त्यांच्यावर भरभरून कृपा आहे’, असे विचार येऊन मला बाबांच्या मृत्यूचे दुःख होत नव्हते. त्या वेळी माझे मन स्थिर आणि शांत होते.’

सौ. शोभा सूर्यकांत साळुंके (सौ. अश्विनी कार्तिक साळुंके यांच्या सासूबाई), फोंडा, गोवा.

१. संघभावना : ‘काकांमध्ये संघभावना होती. दोन्ही कुटुंबांत वेगळेपणा न ठेवता सर्वांमध्ये मिळून-मिसळून रहाण्याचा त्यांचा प्रयत्न असायचा.

२. अंतर्मुख : ‘काका सतत अनुसंधानात आहेत’, असे जाणवायचे. त्यांच्यावर बाह्य गोष्टींचा कोणताही परिणाम होत नसे.

श्री. जगदीश बाळकृष्ण विभांडिक (पुतण्या), ठाणे

१. काकांची परात्पर गुरु डॉक्टरांवर श्रद्धा असणे : ‘काकांची प.पू. गुरुदेवांवर श्रद्धा होती. त्यांनी त्यांच्या जीवनातील प्रत्येक कृती परात्पर गुरु डॉक्टरांचे स्मरण करूनच केली आहे.

२. काकांशी भ्रमणभाषवर बोलतांना त्यांचा आवाज अस्पष्ट येणे आणि ‘त्यांच्याशी हे शेवटचे बोलणे आहे’, असे मनात येणे : एकदा मला ‘काकांशी बोलावे’, असे वाटले; म्हणून मी त्यांना भ्रमणभाष केला. तेव्हा मला ‘काकांचा आवाज अस्पष्ट येत आहे’, असे वाटले. त्यांच्याशी बोलतांना ‘त्यांचे आणि माझे हे शेवटचे बोलणे असेल’, असे मला वाटत होते. त्या दिवसापासून मला अस्थिर आणि असुरक्षित वाटू लागले. नंतर ४ दिवसांनी मला काकांचे निधन झाल्याचे समजले.’

एक साधिका, ठाणे

१. ‘विभांडिककाका काही मासांपूर्वी आमच्या घरी आले होते. त्या वेळी आम्हाला चैतन्य आणि शांती जाणवली.

२. काका मितभाषी आणि आनंदी होते. त्यांच्याकडे पाहून ‘ते देवाच्या अखंड अनुसंधानात आहेत’, असे मला जाणवत होते.

३. काका आमच्या घरातून निघतांना आमच्या शेजारचे लोक ‘काकांच्यात काहीतरी वेगळे आहे’, असे म्हणाले. मी याविषयी त्यांना विचारल्यावर ते म्हणाले, ‘‘काका देवमाणूस आहेत.’’ तेव्हा माझी भावजागृती झाली.’ (एप्रिल २०१०)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक