सैन्याधिकाऱ्यांना गीता आणि कौटिल्य अर्थशास्त्र शिकवा !

‘कॉलेज ऑफ डिफेन्स मॅनेजमेंट’कडून केंद्र सरकारकडे शिफारस !

अभिनंदनीय शिफारस ! केवळ हे दोन ग्रंथच नव्हे, तर हिंदूंचे असे अनेक धर्मग्रंथ सैन्याधिकारी आणि सैनिक यांना शिकवणे आवश्यक आहे. त्यातून त्यांचे मनोबल वाढण्यासह नेतृत्व गुण वाढण्यास साहाय्य होईल ! – संपादक

नवी देहली – ‘कॉलेज ऑफ डिफेन्स मॅनेजमेंट’कडून करण्यात आलेल्या एका अभ्यासातून श्रीमद्भगवद्गीता आणि कौटिल्य अर्थशास्त्र यांसारख्या प्राचीन ग्रंथांचा सैन्य प्रशिक्षणामध्ये समावेश करण्याची शिफारस केंद्र सरकारकडे केली आहे. या संदर्भात अधिक संशोधन केले जाऊ शकते. त्यासाठी ‘भारतीय संस्कृती अभ्यास मंच’ही स्थापन केला जाऊ शकतो, असेही या अभ्यासात म्हटले आहे. सिकंदराबाद (तेलंगाणा) येथे ‘कॉलेज ऑफ डिफेन्स मॅनेजमेंट’चे सैन्य प्रशिक्षण केंद्र आहे. येथे सैन्याच्या तीनही दलांच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना प्रशिक्षण दिले जाते. या केंद्राकडून ‘प्राचीन भारतीय संस्कृती आणि युद्धतंत्र यांचे गुण अन् वर्तमानातील संरक्षण आणि प्रशिक्षण’ या संदर्भात प्रकल्प राबवण्यात येत आहे. याद्वारे भारतीय प्राचीन ग्रंथांचा शोध घेऊन त्या ग्रंथांद्वारे संरक्षणाच्या दृष्टीने नेतृत्व गुण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

(म्हणे) ‘सैन्याचे राजकीयकरण करण्याचा प्रयत्न !’ – काँग्रेस

कारगिलचे युद्ध मुसलमान सैनिकांच्या साहाय्याने जिंकल्याचाही दावा

  • काँग्रेसने निदान सैन्याच्या संदर्भात तरी राजकारण करू नये. श्रीमद्भगवद्गीतेचा विरोध करण्यातून काँग्रेसचा तीव्र हिंदुद्वेष लक्षात येतो. ‘बायबल आणि कुराण यांचे शिक्षण देण्याचा प्रयत्न केला पाहिजे’, असे कुणी म्हटले असते, तर काँग्रेसला आनंदाच्या उकळ्या फुटल्या असत्या, असे कुणाला वाटल्यास आश्चर्य वाटू नये ! – संपादक
  • ‘भारतीय सैन्य धर्मनिरपेक्ष आहे’, असे काँग्रेस सांगते आणि कारगिल विजयाचे श्रेय मात्र मुसलमान सैनिकांना देऊन ‘हिंदु आणि मुसलमान सैनिक’ असा भेदभाव करते. हाच निकष लावून काँग्रेसवाले भारतीय स्वातंत्र्याचे श्रेय हिंदूंना देण्यास का कचरतात ? काँग्रेसवाल्यांची बेगडी धर्मनिरपेक्षता यातून लक्षात येते ! – संपादक

काँग्रेसने या शिफारसीचा विरोध केला आहे. काँग्रेसचे प्रवक्ते के.के. मिश्रा यांनी म्हटले की, श्रीमद्भगवद्गीता आणि अर्थशास्त्र शिकवणे, हे सैन्यदलांचे राजकीयकरण करण्यासारखे आहे. कमीतकमी सैन्याच्या संदर्भात तरी राजकारण करू नये. आम्ही मुसलमान सैनिकांच्या साहाय्याने कारगिल युद्ध जिंकले होते.