पुणे – कोरोनाच्या संभाव्य तिसर्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारची सण आणि उत्सव यांना पूर्ण अनुमती देण्याची सिद्धता नाही. मंदिरे उघडण्याविषयी विरोधी पक्षांकडून आंदोलने केली जात आहेत; परंतु केंद्र सरकारनेच सण आणि उत्सव यांच्या पार्श्वभूमीवर निर्बंध लागू करण्याची सूचना दिली आहे. त्यामुळे मंदिरे उघडता येत नाहीत. भाजपने आंदोलन करण्यापूर्वी केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाच्या सूचना वाचाव्यात. आगामी गणेशोत्सवात नवीन निर्बंध लागू केले जाणार नाहीत; परंतु पहिल्या दिवशी होणारी गर्दी पाहून निर्बंध लागू करायचे कि नाही ? याविषयीचा निर्णय घेण्यात येईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलतांना केले.
ते पुढे म्हणाले की, घरगुती गणेशोत्सव साजरा करण्यास अनुमती आहे; मात्र सार्वजनिक ठिकाणी गणेशोत्सव कसा साजरा करायचा ?, याविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेतील. त्या निर्णयाची कार्यवाही सर्व गणेशोत्सव मंडळांनी करावी.