(म्हणे) ‘भारताने तालिबानच्या विरोधकांना आश्रय दिल्यास आम्हाला कृती करणे भाग पडेल !’ अफगाणी नेता गुलबुद्दीन हेकमत्यार याची भारताला धमकी

  • तालिबानसारख्या फुटकळ आतंकवादी संघटनेला समर्थन करणार्‍या नेत्याचे भारताला अशी धमकी देण्याचे धारिष्ट्य होते, हे भारताला लज्जास्पद ! भारताने अशा नेत्यांना अफगाणिस्तानमध्ये घुसून धडा शिकवण्याची आवश्यकता आहे ! – संपादक
  • भारताच्या विरोधातील पाकला, पाकपुरस्कृत आतंकवादी संघटनांना, त्यांच्या आतंकवाद्यांना तालिबान अफगाणिस्तानमध्ये आश्रय देत आहे. त्याविषयी अफगाणी नेता गप्प का आहे ? भारतानेही अशा नेत्यांना यावरून जशास तशी धमकी दिली पाहिजे ! – संपादक
अफगाणी नेता गुलबुद्दीन हेकमत्यार

काबुल (अफगाणिस्तान) – तालिबानच्या विरोधकांना भारताने आश्रय देऊ नये. यापासून त्याने लांब राहिले पाहिजे. तालिबानच्या विरोधकांना आश्रय देणे म्हणजे तालिबानी सरकारच्या विरोधकांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासारखे आहे. त्यामुळे तालिबानला (भारताच्या विरोधात) कृती करणे भाग पडेल, अशी धमकी तालिबनी समर्थक अफगाणी नेता गुलबुद्दीन हेकमत्यार याने दिली आहे. ‘सी.एन्.एन्. न्यूज १८’ वृत्तवाहिनीला मुलाखत देतांना त्याने ही धमकी दिली आहे. हेकमत्यार याच्यावर १९९२ ते १९९६ कालावधीत काबुलमध्ये सहस्रो नागरिकांना ठार मारल्याचा आरोप आहे. हेकमत्यार २ वेळा अफगाणिस्तानचा पंतप्रधान होता. वर्ष २०१७ मध्ये तत्कालीन राष्ट्रपती अशरफ घनी यांनी त्याला क्षमा केली होती.

गुलबुद्दीन हेकमत्यार याने पुढे असेही म्हटले की, अफगाणिस्तान आणि त्याच्या नवीन राज्यकर्त्यांना काश्मीरच्या प्रश्नामध्ये रस नाही. अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर इतर देशांना करू देणार नाही. भारताने याविषयी भीती बाळगू नये. (यावर कोण विश्वास ठेवणार ? एकीकडे हेकमत्यार असे सांगतो, तर दुसरीकडे तालिबानचा प्रवक्ता ‘काश्मिरी मुसलमानांसाठी आवाज उठवू’ असे म्हणतो ! तालिबान्यांना काश्मीरमध्ये रस नाही, तर त्याने त्याचा मित्र पाकला सांगावे की, पाकव्याप्त काश्मीर भारताला परत करावा आणि काश्मीरमध्ये आतंकवादी कारवाया बंद कराव्यात ! – संपादक)