स्वयंपाक बनवण्याची सेवा परिपूर्ण आणि भावपूर्ण करणार्‍या रामनाथी आश्रमातील श्रीमती मंगला पुराणिक (वय ६९ वर्षे) !

श्रीमती मंगला श्रीराम पुराणिककाकू रामनाथी आश्रमातील संत आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्यासाठी स्वयंपाक बनवण्याची सेवा करतात. काकूंचे वय ६९ वर्षे आहे; पण काकूंच्या कृतीतून ते लक्षात येत नाही.

श्रीमती मंगला पुराणिक

१. स्वतः परिपूर्ण सेवा करणे आणि इतरांनाही परिपूर्ण सेवा करण्याविषयी सांगणे

‘एकदा मी चहा बनवला आणि चहाची भांडी तशीच ठेवून दुसर्‍या सेवेसाठी गेले. मी स्वयंपाकघरात परत आल्यावर काकूंनी मला माझी चूक सांगितली. त्या म्हणाल्या, ‘‘आपण सेवा परिपूर्ण करायला हवी. एखादा पदार्थ बनवण्याची सेवा करतांना तो पदार्थ बनवणे, एवढेच त्या सेवेचे स्वरूप नसते. पदार्थ बनवून झाल्यावर त्यासाठी वापरलेली भांडी आवरून ठेवली, तरच ती सेवा परिपूर्ण होते.’’ काकू नेहमी परिपूर्ण सेवा करतात. काकू प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक भावपूर्णरित्या आणि परिपूर्ण करतात, तसेच त्या इतरांनाही परिपूर्ण सेवा करायला शिकवतात.

२. व्यष्टी साधनेच्या प्रयत्नांत सातत्य

काकू नियमितपणे व्यष्टी साधनेचे प्रयत्न करतात. त्या प्रतिदिन सारणी लिखाण आणि भावजागृतीसाठी प्रयत्न करतात. त्या आश्रमातील कार्यपद्धतींचेही नियमितपणे पालन करतात.

कु. अमृता मुद्गल

३. चुकांविषयी संवेदनशीलता

एकदा त्यांनी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्यासाठी बनवलेल्या जेवणात मीठ अल्प प्रमाणात होते. मी पुराणिककाकूंना याविषयी सांगितले. तेव्हा काकूंना पुष्कळ खंत वाटली. त्यांनी कान पकडून माझी क्षमा मागितली. त्यातून काकूंना वाटणारी चुकांची खंत आणि त्यांची अंतर्मुखता माझ्या लक्षात आली.

४. काकू झोपत असलेल्या पलंगाकडे पाहून तो ‘संतांचा पलंग आहे’, असे वाटणे

एकदा मी पुराणिककाकूंच्या निवासस्थानी सेवेसाठी गेले होते. त्या वेळी काकू झोपत असलेल्या पलंगाकडे पाहिल्यावर ‘तो एखाद्या संतांचा पलंग असावा’, असे मला वाटले. यातून ‘काकूंची प्रत्येक विचार आणि कृती सात्त्विक आहे’, हे माझ्या लक्षात आले. काकूंच्या मनातील भाव त्यांच्या तोंडवळ्यावर दिसतो.

५. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी काकूंनी बनवलेल्या स्वयंपाकाचे कौतुक करणे

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ अनेक वेळा म्हणतात, ‘‘आज काकूंनी बनवलेला स्वयंपाक छान झाला होता. माझे पोट भरले आणि मनही तृप्त झाले. काकू स्वतः परिपूर्ण आहेत.’’ काकूंच्या हाताला चांगली चव आहे. काकूंनी बनवलेल्या अन्नपदार्थांमधून काकूंच्या मनात संतांप्रती असलेला भाव लक्षात येतो.

६. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भाव

एकदा आम्हाला परात्पर गुरु डॉक्टरांचा सत्संग लाभला. तेव्हा परात्पर गुरु डॉक्टरांना पहाताच काकूंच्या डोळ्यांतून भावाश्रू आले. त्यांनी हात जोडून केवळ ‘कृतज्ञता’ हा शब्द उच्चारला. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती काकूंच्या मनात उच्च कोटीचा भाव आहे.’

– कु. अमृता मुद्गल (वय १८ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१.२.२०२१)