मुल्ला हैबतुल्ला अखुंदजादा अफगाणिस्तानचा सर्वोच्च नेता ! – तालिबानची घोषणा

काबुल (अफगाणिस्तान) – तालिबानने मुल्ला हैबतुल्ला अखुंदजादा याला त्यांचा सर्वोच्च नेता असल्याचे घोषित केले आहे. ‘टोलो न्यूज’च्या वृत्तानुसार, तालिबानने मुल्ला हैबतुल्ला अखुंदजादा याच्या नेतृत्वाखाली पंतप्रधान किंवा राष्ट्राध्यक्ष देश चालवणार असल्याचे म्हटले आहे.

१. तालिबानच्या सांस्कृतिक आयोगाचा सदस्य अनामुल्ला समांगनी याने सांगितले की, मुल्ला हैबतुल्ला अखुंदजादा हा नवीन सरकारचा नेता असेल. इस्लामी अमिरात (अफगाणिस्तानला तालिबानने दिलेले नवीन नाव) येत्या २ दिवसांत नवीन सरकार घोषित करील. नवीन सरकार स्थापनेविषयीची चर्चा जवळजवळ संपली आहे आणि मंत्रीमंडळाविषयी आवश्यक चर्चा झाली आहे. आम्ही घोषित करू ते इस्लामी सरकार लोकांसाठी आदर्श असेल.

२. तालिबानचा सदस्य अब्दुल हनान हक्कानी याने म्हटले आहे की, इस्लामी अमिरात प्रत्येक प्रांतात सक्रीय आहे. प्रत्येक प्रांतात राज्यपाल काम करू लागले आहेत. प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा राज्यपाल आणि प्रांतातील एक पोलीस प्रमुख आहे जो लोकांसाठी काम करत आहे.