पणजी- गोव्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांना आता कोरोना प्रतिबंधक लसीची दुसरी मात्रा (डोस) घेण्यासाठी ८४ दिवसांची वाट पहावी लागणार नाही, तर त्यांना ४२ दिवसांनी दुसरी मात्रा घेता येईल, असे राज्य लसीकरण विभागाचे प्रमुख डॉ. राजेंद्र बोरकर यांनी सांगितले.
५ सप्टेंबरला शिक्षकदिन असून शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी शिक्षकदिनापर्यंत लसीकरण पूर्ण करावे, असे उद्दिष्ट आहे, असे डॉ. बोरकर यांनी सांगितले.
विदेशी नागरिकांसाठी लसीकरण सुविधा
गोव्यात विदेशी नागरिकांसाठीही लसीकरण चालू करण्यात आले आहे. पारपत्र (पासपोर्ट) सादर केल्यास त्यांना लस दिली जाणार आहे. विदेशी नागरिकांनी पोर्टलवर नोंदणी करावी किंवा थेट लसीकरण केंद्रावर उपस्थित रहावे, तसेच गोव्याबाहेरून जे एक मात्रा (डोस) घेऊन आलेले आहेत, त्यांना दुसरी मात्रा गोव्यात घेता येईल, असे कोरोना लसीकरणाचे अधिकारी डॉ. अनुप नेत्रावळकर यांनी सांगितले.
१० आणि ११ सप्टेंबरला श्री गणेशचतुर्थीनिमित्त सार्वजनिक सुट्टी असल्याने हे दोन दिवस लसीकरण बंद असेल. लसीकरण पुन्हा १२ सप्टेंबरला चालू होईल, अशी माहिती डॉ. नेत्रावळकर यांनी दिली.