१. संतांनी काय करावे आणि काय करू नये !
१ अ. कर्णमधुर बोलावे आणि सर्वांना आवडणारे ऐकवावे ! : सर्व माणसांशी गोड बोलावे आणि त्यांना चांगले ऐकवावे. ‘त्यांना सदा आनंद द्यावा’, हेच संतांचे काम आहे; कारण संसारातील माणसे त्रासलेली असतात.’
१ आ. साधूसंत आणि बुवा यांनी कुठे थांबू नये ! : ‘लग्नसोहळा, जेथे पानचट गोष्टी चावडीवर चालतात, तसेच जिथे संसार आणि राजकारण यांच्या गप्पा चालतात, तिथे साधूसंतांनी जाऊ नये. नाटक, तमाशे आणि चित्रपट वर्ज्य करावे; कारण त्यामुळे विकार पिसाळतात आणि शरिरातील चांगल्या आचार-विचारांचा सत्यानाश होतो. आलेला देव शरिरातून बाहेर पळून जातो. शरिरात पाप भरते आणि पुण्य पळते.’
२. साधू-संतांचे जीवन
२ अ. लोभ किंवा आसक्ती यांमुळे मनुष्य दुःखी होणे; मात्र वैराग्य प्राप्त झालेले संत जगाच्या दृष्टीने वेडे असले, तरी त्यांच्यापाशीच ज्ञान असणे, तेच समाजाला सुखाचा ईश्वरी मार्ग दाखवत असणे : ‘मनुष्य प्राणी अस्वस्थ (बेचैन) आणि कावराबावरा का आहे ? त्याला लोभामुळे त्रास होतो. साठेबाजी करणार्यांना लोभामुळे ‘अजून हवे, अजून हवे’, असे वाटते. ८४ लक्ष प्रकारच्या प्राण्यांत केवळ माणूस आणि उंदीर हेच साठा करतात. बाकीच्या प्राण्यांचे ‘वेळेपुरते झाले की, बस झाले’, असे असते. देव सर्वांना दाणा देऊन पोसतो. रानातील प्राणी किंवा झाडावरील पक्षी संसार साठवत नाहीत, तरी ते माणसांपेक्षा आपल्या जीवनाचा आनंद लुटतात. माणूस मात्र सदैव दुःखी प्राणी असतो. मनुष्य लाज-लज्जा बाळगतो. तो वस्त्राविना फिरू शकत नाही. ज्या संतांना वैराग्य आणि विरक्ती प्राप्त झाली, ते जगात वेड्यासारखे दिसतात; परंतु तेच जगाला शहाणे करतात. ते ज्ञानाचे बोल बोलून माणसाच्या शरिरातील अज्ञानाचा काळोख साफ झाडून टाकतात आणि माणसाला ज्ञानाचा प्रकाश देतात. त्याला सुखाचा परमेश्वरी मार्ग दाखवतात. साधूसंत हे असे असतात.’
२ आ. संत लौकिक सुखात न रमता ईश्वराच्या नामस्मरणात रमतात ! : आम्ही ईश्वर नामात रमतो. मला आता सगळे दिवस सारखे आहेत. प्रतिवर्षी दिवाळी, दसरा, गौरी-गणपति आणि शिमगा येतो. प्रतिवर्षी पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळा येतो. प्रतिवर्षी वर्ष पालटत असते. प्रतिदिन जन्म-मृत्यू होतात. हे ईश्वरी चक्र परमेश्वराने सतत चालू ठेवले आहे. आम्ही संत याच्या पलिकडे आहोत. आम्हाला यात गोडी नाही. आम्हाला ईश्वराच्या नामस्मरणात गोडी आहे.’
२ इ. संत शाश्वत सुखाच्या मागे असणे : संतांनी बाई वर्ज्य केली आहे. मद्य, गांजा, अफू, नशा, संसार आणि नातेवाईक, असे सर्व जाळे गुरफटवणारे तोडून टाकले आहेत अन् ते शाश्वत ईश्वरी सुखाच्या मागे लागले आहेत.’
२ ई. केवळ खरे साधू आणि संत शाश्वत सुखाच्या मागे गेले ! : ‘कुणी घर बांधतो, कुणी वाडा बांधतो, कुणी गाडी घेतो, कुणी दुकान टाकतो, कुणी कारखाना टाकतो, तर कुणी शेती करतो. हे सर्व लोक अशाश्वत सुखाच्या मागे धावत सुटलेले आहेत. शाश्वत सुखाच्या मागे केवळ साधू आणि संत गेले. बाकी सगळ्यांची दिखाऊ भक्ती ! टिळे लावतात आणि दाखवण्यासाठी माळा घालतात; मात्र वर्तणूक वाईट करतात.’
३. देवाची कृपा झालेले संत
‘देव मिळवणे सोपे नाही. पुण्य साठवणार्याला इथे पेटते निखारे खावे लागतात, म्हणजे समाजाकडून हाल सोसावे लागतात. सतत संकटांशी सामना करावा लागतो. वाईट शक्ती त्याला जगणे अवघड (मुश्कील) करून ठेवतात. सर्प, विंचू आणि माणसे त्याला धड जगू देत नाहीत. अशा सर्व संकटांना सामोरे जात जिवाने धरणीमातेवर पुण्य जमा करून पराकोटीची भक्ती केली की, काय काय होते, ते पहा. ईश्वर त्याच्या बुद्धीमध्ये येऊन जे जगाला दिसत नाही, असे ज्ञान देतो आणि गुपित (गुह्य ज्ञान) सांगतो. पराकोटीची भक्ती म्हणजे इथे भक्तीची सीमा संपली. त्या माणसाला समाजात कीर्ती मिळते. त्याच्या हातून ग्रंथ लिखाण होते. तो पापी लोकांचे पाप धुतो आणि ईश्वराचे सैन्य वाढवतो. ज्या कुळात असा महान आत्मा जन्माला येतो, त्याच्या बेचाळीस पिढ्यांचा देव उद्धार करतो. भरपूर पुण्य साठवतो आणि चांगले काम केल्यामुळे देव त्याला वरती चांगली जागा देतो. तो जीव वरती आनंदात देवांकडे रहातो. सर्व संतांची अशी दशा असते.’
४. भारत देश संन्याशांच्या हातात दिल्यास या देशात सोन्याचा धूर निघेल !
‘या देशाचा स्वच्छ कारभार कोण करू शकेल ? हा देश चालवण्यासाठी संत, साधू किंवा संन्यासी यांच्या हातात द्यावा; कारण ते देशाचे लचके तोडून खाणार नाहीत. भ्रष्टाचार करणार नाहीत. बाकीचे ‘फॅमिली’वाले असतील, तर पैसे खातीलच. तसेच ग्रामसेवक, तलाठी, सरपंच, प्रांत, तहसीलदार आणि अधिवक्ता हे सगळे देश चालवायचे नाहीत. ते पैसेच खाणार; म्हणून निवडणुकीची घटना पालटून वर सांगितल्याप्रमाणे हा भारत देश संन्याशांच्या हातात द्यावा. मग बघा या देशात सोन्याचा धूर निघेल आणि प्रजा सुखी होईल. आपल्या या देशात काहीही न्यून नाही; परंतु देशाला भ्रष्टाचाराची कीड लागल्यामुळे इथे गोंधळ माजला आहे. लबाड आणि लुच्चे देशाला फसवत आहेत. त्यांना फाशी दिली पाहिजे.’
५. संसार हे भाड्याचे घर असून मी देवाकडे, म्हणजे स्वतःच्या घरी जाणार आहे ! – कै. पूज्य (ह.भ.प.) सखाराम रामजी बांद्रे
इथे संसाराचा खोटा खेळ संपला की, मी जिथून आलो, तिथे जाणार. पूर्वी देवाच्या घरातून आलो. तेव्हा शरीररूपी भाड्याच्या घरात थोडे दिवस रहात आहे. हा इथला खेळ संपला की, परत ‘ओनरशिप’ (स्वतःच्या) घरात जाणार. संसाराचा मांडलेला विटीदांडूचा खेळ आता संपत आला आहे.’
(क्रमशः पुढच्या रविवारी)
– पू. (ह.भ.प.) कै. सखाराम रामजी बांद्रे, मु.पो. निवळी (कातळवाडी), ता. चिपळूण, जिल्हा रत्नागिरी. (पू. सखाराम बांद्रे महाराज यांचे हे लिखाण २००५ ते २०२० या कालावधीतील आहे.)
(संदर्भ : लवकरच सनातन संस्था प्रकाशित करणार्या ग्रंथातून)