सहस्रो अफगाणी नागरिकांचा सीमेवरून पाकमध्ये घुसण्याचा प्रयत्न !

नवी देहली – अफगाणिस्तानवरील तालिबानच्या नियंत्रणानंतर सहस्रो अफगाणी नागरिक पलायन करत आहेत. विमानाच्या माध्यमांतून, तसेच सीमेवरून शेजारी देशांत जाण्याचा ते प्रयत्न करत आहेत. या संदर्भात एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यानुसार अफगाणी नागरिक पाकिस्तान सीमेवरून पाकमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत आहेत. अफगाणी नागरिक सीमेवरील प्रवेशद्वारे उघडण्याची मागणी करत आहेत. एका अहवालानुसार जवळपास १४ लाखांपेक्षा अधिक अफगाणी लोक या वेळी पाकिस्तानमध्ये शरणार्थी म्हणून गेले आहेत.

पाकच्या एका पत्रकाराने हा व्हिडिओ ट्वीट केला आहे. यात तो म्हणतो की, हे काबुल विमानतळ नाही, तर ‘स्पिन बोलदाक’ सीमा आहे. या ठिकाणी सहस्रो लोक अफगाणिस्तानातून पाकिस्तानात जाण्यासाठी पलायन करत आहेत. येथे काबुल विमानतळापेक्षाही भयानक अवस्था आहे; परंतु येथे कुणीही परदेशी सैनिक तैनात नाही. त्यामुळे याकडे कुणाचेही लक्ष जात नाही.