साधकांच्या प्रगतीचा विचार करणार्या आणि साधकांना आधार देणार्या मिरज येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. सुरेखा आचार्य (वय ६४ वर्षे) !
१. साधी रहाणी
‘कु. सुरेखा आचार्य यांची रहाणी अत्यंत साधी असून त्यांच्यात दिखाऊपणा नसतो.
२. आनंदी
त्या एकट्या असल्या तरीही त्या कधी नाराज नसतात. त्या सतत आनंदी असतात.
३. इतरांचा विचार करणे
मिरज आश्रमात प्रथमोपचाराचे शिबिर असतांना सुरेखाताई स्वतःहून स्वच्छता करणे, आसंद्या लावणे, बॅनर लावणे, श्रीकृष्णाची पूजा करणे इत्यादी पुढाकार घेऊन करतात. त्यामुळे मला पुष्कळ आधार वाटतो आणि सेवेचा ताण येत नाही.
४. व्यष्टी साधनेची तळमळ
त्यांचा व्यष्टी साधनेची सर्व सूत्रे पूर्ण करण्याचा प्रयत्न असतो. त्या वस्तूनिष्ठ आढावा देतात. त्या स्वतःचे कौतुक करत नाहीत.
५. सतत उत्साही राहून सेवारत असणे
त्यांची दिनचर्या पहाटेपासून आरंभ होते, तरीही कुणी त्यांना दुपारी भेटायला गेल्यावर त्या तितक्याच उत्साही दिसतात. त्या कोणत्याही सेवेला नकार देत नाहीत. ‘माझे वय झाले आहे, मला झेपत नाही’, असे त्या कधीही सांगत नाहीत. त्यांचा उत्साह पाहून आम्हाला उत्साह येतो. ‘कोणत्याही प्रसंगात देव काहीतरी शिकवत आहे’, असे त्या लक्षात आणून देतात.’
– आधुनिक वैद्या श्रीमती मृणालिनी भोसले, मिरज
६. ‘कर्तेपणा घेणे आणि प्रतिमा जोपासणे’ या अहंच्या पैलूंवर प्रयत्न करणे
‘ताईंमध्ये पूर्वी कर्तेपणा घेणे आणि प्रतिमा जोपासण्याचा भाग होता, तसेच इतरांच्या चुका न सांगणे, असाही भाग होता; मात्र आता त्यांचा ‘इतरांना साधनेसाठी साहाय्य करणे, प्रतिमा न जोपासणे आणि कर्तेपणा सतत ईश्वराला अर्पण करणे’, असा भाग वाढलेला आहे. त्यांच्याशी बोलताना मन हलके होते.’
– सौ. शोभा शेट्टी, मिरज
७. सत्संग श्रीगुरुच घेत असल्याचा भाव निर्माण करणार्या कु. सुरेखा आचार्य !
७ अ. भावप्रयोग सांगताना भाव जागृत होणे : सुरेखाताई अनुभूती किंवा चांगला अनुभव सांगतांना स्थिर असतात. त्या सतत श्री गुरूंविषयी बोलत असतात. सत्संगात प्रार्थना किंवा भावप्रयोग सांगताना त्यांचा भाव जागृत होतो. सत्संगात पुष्कळ सूत्रे असतात आणि त्यामानाने वेळ अल्प असतो, तरीही प्रथमोपचाराचा एखादा तरी प्रायोगिक भाग घ्यायची त्या मला संधी देतात. मला त्याविषयी पुष्कळ कृतज्ञता वाटते.
७ आ. श्रीगुरुच त्यांच्या माध्यमातून बोलत असल्याचे जाणवून त्यांनी सांगितलेली चूक अंतर्मनापर्यंत पोचणे : त्या स्वभावदोष निर्मूलन सत्संग घेतांना तटस्थपणे चूक सांगतात. त्या कधीही ‘साधकांना दुखावले जाईल’, असे बोलत नाहीत; पण ‘साधकांना चुकीच्या मुळापर्यंत जायला साहाय्य होईल’, याची त्या काळजी घेतात. त्या आध्यात्मिक त्रास असणार्या साधकांना समजून घेतात. ते काही रागाने बोलले तरी, त्या शांतपणे प्रसंग हाताळतात. त्या सर्व साधकांपर्यंत महत्त्वाचे विषय पोचण्याची काळजी घेतात. ‘त्यांनी सत्संग घेतल्यावर साधकांना त्यांची चूक अंतर्मनापर्यंत पोचली आहे’, असे जाणवते. ‘त्या बोलत नाहीत, तर श्री गुरुदेवच त्यांच्यामधून बोलतात आणि त्यांच्या माध्यमातून सांगतात’, असे नेहमी जाणवते.
७ इ. अडचणींवर प्रार्थना करून, तसेच श्री गुरुदेवांना शरण जाऊन मात करणे : काही वेळा साधक सांगितलेली सेवा करत नाहीत किंवा त्यांना अकस्मात् अडचण आल्याने अतिशय कठीण स्थिती असते. अशा वेळी ताई प्रार्थना करून, श्री गुरुदेवांना शरण जाऊन स्थिर राहून सर्व परिस्थिती हाताळतात. त्या सर्वच गोष्टी देवाला विचारून आणि देवाचे साहाय्य घेऊन करतात.
७ ई. साधकांना तत्त्वनिष्ठतेने मार्गदर्शन करणे : साधकांना ताईंशी मनमोकळेपणाने बोलता येते. त्यांना काही विचारायचे असल्यास त्या कधीही सिद्ध असतात. त्या योग्य मार्गदर्शन करतात. ‘त्यांनी सांगितलेले मला कधी पटले नाही किंवा मनात काही राहिले’, असे कधीही झाले नाही. त्या नेहमी तत्त्वाला धरूनच सांगतात. त्यांच्याशी बोलल्यावर माझे मन शांत होऊन चिंतन चालू होते. सर्व साधकांना असा अनुभव आहे. त्यांचा साधकांच्या प्रकृतीचा चांगला अभ्यास आहे.’
– आधुनिक वैद्या श्रीमती मृणालिनी भोसले
७ उ. साधकांना आधार वाटणे : ‘त्यांना साधकांच्या प्रगतीची पुष्कळ तळमळ आहे. त्या स्वतःला होणार्या शारीरिक त्रासाचा विचार न करता सेवा करतात. त्या साधकांना सेवेचे बारकाईने चिंतन करायला शिकवतात आणि त्यांच्याकडून तसे करून घेतात.’
– सौ. शोभा शेट्टी, मिरज (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के)
८. आध्यात्मिक मैत्रीण
‘त्या माझ्या आध्यात्मिक मैत्रीण आहेत. माझी मनःस्थिती ठीक नसल्यास मी त्यांना विचारते. त्या मला आधार देतात आणि ‘काय करायला पाहिजे ? कसे विचार असायला पाहिजेत ?’, याविषयी सांगतात.
श्री गुरुदेवांनीच माझ्याकडून त्यांच्याविषयी लिहून घेतले. ‘त्यांचे गुण माझ्यात येण्यासाठी माझ्याकडून प्रयत्न करवून घ्यावेत’, हीच श्री गुरुचरणी कळकळीची प्रार्थना ! ‘श्री गुरुदेवांनी मला अशी गुणी मैत्रीण देऊन सांभाळले आहे’, याबद्दल मी श्री गुरुचरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’
– आधुनिक वैद्या श्रीमती मृणालिनी भोसले, मिरज, सांगली. (२५.८.२०२०)
|