जेएनयूआणि ‘टाटा सामाजिक विज्ञान संस्था’ या विद्यापिठांतील विद्यार्थ्यांचा आतंकवादी कारवायांत सहभाग !

शहरी नक्षलवादाच्या प्रकरणात अटकेतील आरोपींविषयी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेचा धक्कादायक खुलासा !

भारतविरोधी घोषणा देणारे आणि नक्षलवादी कारवायांमध्ये सहभागी असलेल्या आरोपींचे समर्थन करणारे ‘जेएन्यू’ आणि टाटा सामाजिक विज्ञान संस्था यांचे विद्यार्थीही राष्ट्रद्रोहीच आहेत. अन्वेषण यंत्रणांनी या प्रकरणी सखोल अन्वेषण करून राष्ट्रविरोधी शक्तींचा बिमोड करावा ! – संपादक

मुंबई – शहरी नक्षलवादाच्या प्रकरणी अटकेत असलेल्या आरोपींना स्वत:चे सरकार स्थापन करायचे होते. त्यामुळेच त्यांनी अस्तित्वात असलेले सरकार उलथवून लावण्यासाठी देशाविरुद्ध युद्ध पुकारले. स्फोटकांचा वापर करून नागरिकांच्या मनात भय निर्माण करण्याचा त्यांचा हेतू होता. त्यासाठी त्यांनी जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएनयू), टाटा सामाजिक विज्ञान संस्था (टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस) यांसारख्या नामांकित विद्यापिठांतील विद्यार्थ्यांना या आतंकवादी कारवायांत सहभागी करण्यास प्रारंभ केला होता, असा धक्कादायक खुलासा राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने विशेष न्यायालयात सादर केलेल्या आरोपांच्या प्रारूप मसुद्यात केला आहे. केंद्र आणि महाराष्ट्र सरकार यांच्या विरोधात ते युद्ध पुकारणार होते, असा गंभीर आरोपही यात करण्यात आला आहे.

या मासाच्या प्रारंभी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने हा मसुदा न्यायालयात सादर केला. यामध्ये नक्षलवादाच्या प्रकरणी अटकेत असलेल्या १५ आरोपींवर १७ आरोप ठेवण्यात आले आहेत. यांमध्ये अवैध कारवाया प्रतिबंध कायद्याचाही (‘यूएपीए’चाही) समावेश आहे. अटक करण्यात आलेले आरोपी ‘सीपीआय्’ (माओवादी) या बंदी घालण्यात आलेल्या संघटनेचे सदस्य आहेत. ‘पुणे येथे झालेल्या एल्गार परिषदेच्या बैठकीत चिथावणी देणारे लघुनाट्य आणि गाणी सादर करण्यात आली होती’, असेही या मसुद्यात म्हटले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये अधिवक्ता सुधा भारद्वाज, वेर्णन गोन्सालविस, वरवरा राव, प्रा. आनंद तेलतुंबडे, देहली विद्यापिठाचे प्रो. हनी बाबू, शोमा सेन, गौतम नवलखा, सुरेंद्र गडलिंग यांचा समावेश आहे.