चीनच्या अणूचाचण्यांमधून झालेल्या किरणोत्सर्गामुळे वर्ष १९६४ ते १९९६ या कालावधीत १ लाख ९४ सहस्र लोकांचा मृत्यू

चीन त्याच्या शत्रूचा विनाश करण्यासाठी अणूबॉम्ब बनवत असला, तरी त्यामुळे त्याच्याच देशात लाखो लोक मरत आहेत. यातून चीन काही धडा घेईल का ? – संपादक 

प्रातिनिधिक छायाचित्र

नवी देहली – चीनने वर्ष १९६४ ते १९९६ या कालावधीत सुमारे ४५ अणूचाचण्या केल्या होत्या. या अणूचाचण्यांमुळे निर्माण झालेल्या तीव्र किरणोत्सर्गामुळे त्या देशातील १ लाख ९४ सहस्र लोकांचा मृत्यू झाला. ‘द नॅशनल इंटरेस्ट’ या नियतकालिकामध्ये प्रसिद्ध झालेल्या पीटर सुसिऊ यांच्या लेखामध्ये ही माहिती देण्यात आली आहे. सुमारे १२ लाख लोकांना या किरणोत्सर्गामुळे ल्युकेमिया आणि कर्करोग यांसारख्या घातक आजारांचा धोका असल्याचाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

१. पीटर सुसिऊ यांनी लिहिले आहे की, चीनने वर्ष १९६९ मध्ये पहिले थर्मोन्युक्लिअर (अणूस्फोटात उत्पन्न होणार्‍या प्रचंड तापमानावर आधारलेले) परीक्षण केले. या चाचणीमधून ३.३ मेगाटन एवढी ऊर्जा निर्माण झाली. ही ऊर्जा हिरोशिमावर टाकलेल्या अणूबॉम्बपेक्षा २०० पट अधिक होती.

२. किरणोत्सर्गाच्या स्तराचा अभ्यास करणार्‍या एका जपानी संशोधकांनी सांगितले की, चीनच्या शिनजियांगमधील किरणोत्सर्गाचे प्रमाण हे वर्ष १९८६ मधील चेर्नोबिलमधील अणूभट्टीच्या छतावर मोजण्यात आलेल्या प्रमाणापेक्षा अधिक आहे. २६ एप्रिल १९८६ या दिवशी तत्कालीन सोव्हियत संघामधील (आता युक्रेनमध्ये असलेल्या) चेर्नोबिल अणूऊर्जा विद्युत् केंद्राच्या अणूभट्टीमध्ये घेण्यात आलेल्या एका चाचणीच्या वेळी झालेल्या स्फोटात आणि त्यामुळे झालेल्या किरणोत्सर्गामुळे सुमारे ४ सहस्र लोक मृत्यूमुखी पडल्याचा अंदाज व्यक्त केला गेला होता. या दुर्घटनेमुळे तेथील परिसर कायमचा प्रदूषित झाला आहे.