अफगाणिस्तानहून भारतात यायला निघालेले १५० जण सुरक्षित !

काबुल (अफगाणिस्तान) – येथून भारतात यायला निघालेल्या १५० जणांचे अपहरण करण्यात आल्याचे वृत्त प्रसारित झाले होते; मात्र स्थानिक अफगाणी प्रसारमाध्यमांनी स्पष्ट केले की, हे १५० जण सुरक्षित आहेत. यात भारतीय हिंदू, अफगाणी शीख आणि काही अफगाणी मुसलमान यांचा समावेश आहे. त्यांच्या पारपत्रांची तपासणी केली जात आहे. त्यांना मारहाण करण्यात आल्याचे म्हटले जात आहे. भारत सरकारने अपहरणाच्या घटनेला दुजोरा दिलेला नाही. अफगाणी प्रसारमाध्यमांनीही अपहरणाचे वृत्त फेटाळले आहे. तालिबानचा प्रवक्ता अहमदुल्लाह वसेक याने १५० जणांचे अपहरण झाले नसल्याचे म्हटले आहे. भारतीय नागरिकांना सुखरूपरित्या काबुल विमानतळाच्या आत सोडल्याचा दावा वसेक याने केला आहे.

अफगाणिस्तानातून मायदेशी परतण्यासाठी अनेक भारतीय नागरिक काबुल विमानतळावर भारताकडे जाणार्‍या विमानांची वाट पहात आहेत. २१ ऑगस्टला भारतीय वायूसेनेचे एक विमान काबुल विमानतळावरून ८५ नागरिकांना घेऊन येण्यासाठी मार्गस्थ झाले होते. तत्पूर्वी भारतीय नागरिकांच्या अपहरणाचे वृत्त पसरले होते.