अफगाणिस्तानच्या पुनर्बांधणीसाठी तालिबानकडून चीनला आमंत्रण !

‘क्रौर्य’, ‘विश्‍वासघात’, ‘इतरांवर अन्याय करणे’ आदी समान ‘गुण’ असणारा तालिबान आणि चीन एकत्र आल्यास आश्‍चर्य ते काय ? या दोघांची मैत्री केवळ भारतासाठीच नव्हे, तर जागतिक शांततेसाठी धोकादायक आहे. या दोघांच्या मैत्रीमुळे भविष्यात येणार्‍या संकटाला सामोरे जाण्याची सिद्धता भारताने आतापासून केली पाहिजे ! – संपादक

तालिबानचा प्रवक्ता सुहेल शाहीन

काबुल (अफगाणिस्तान) – चीन एक मोठी अर्थव्यवस्था आणि क्षमता असलेला  देश आहे. चीनने अफगाणिस्तानमध्ये शांतता आणि सलोखा वाढवण्यासाठी रचनात्मक भूमिका बजावली आहे. मला वाटते की, चीन अफगाणिस्तानचे पुनर्वसन आणि पुनर्बांधणी यांमध्येही पुष्कळ मोठी भूमिका बजावू शकतो. त्यामुळे चीनचे देशाच्या पुनर्बांधणीत योगदान देण्यासाठी स्वागत आहे, असे तालिबानचा प्रवक्ता सुहेल शाहीन याने चीनच्या माध्यमांना सांगितले आहे. चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांनी गेल्या मासामध्ये तियानजिनमध्ये तालिबानच्या आतंकवादी गटाची भेट घेतली होती.

चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांनीही तालिबानची पाठराखण केली आहे. ब्रिटीश परराष्ट्र सचिव डोमिनिक राब यांच्याशी दूरभाषवर बोलतांना वांग यी म्हणाले की, जगाने अफगाणिस्तानला मार्गदर्शन आणि पाठिंबा द्यावा. त्याच्यावर अधिक दबाव आणू नये; कारण अफगाणिस्तानमध्ये सध्या सत्तेचे हस्तांतर चालू आहे.