अफगाणिस्तानसारखी परिस्थिती देशात कधीही उद्भवणार नाही ! – शिवाजीराव पवार, निवृत्त सुभेदार

श्री स्वामी विवेकानंद चॅरिटेबल ट्रस्टचा ‘एक राखी सीमेवरील जवानासाठी’ उपक्रम    

एक राखी सीमेवरील जवानासाठी या उपक्रमाच्या अंतर्गत उपस्थितांना प्रतिकात्मक राखी बांधतांना विद्यार्थिनी

कोल्हापूर, १९ ऑगस्ट (वार्ता.) – कोल्हापूर, सातारा हे पश्‍चिम महाराष्ट्रातील जिल्हे सैनिकांची पंढरी आहेत. चीनला गलवानमध्ये भारतीय सैन्याने चोख प्रत्युत्तर दिले आहे. अफगाणिस्तानात उद्भवलेली परिस्थिती हा त्यांचा अंतर्गत प्रश्‍न असून भारतीय लष्कर सक्षम असल्याने अशी परिस्थिती देशात कधीही उद्भवणार नाही. नारीशक्ती दुर्गा मातेचा अवतार असून त्यांनी राख्या पाठवून जे पाठबळ दिले आहे ते या पाठिंब्यावरच भारतीय सैन्य शत्रूचा मुकाबला करीत आहे, असे प्रतिपादन साहाय्यक सैनिक कल्याण अधिकारी निवृत्त सुभेदार शिवाजीराव पवार यांनी केले. श्री स्वामी विवेकानंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने ‘एक राखी सीमेवरील जवानासाठी’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. ट्रस्टच्या वतीने गोळा करण्यात आलेल्या राख्या जिल्हा सैनिक अधिकारी यांच्याकडे प्रदान करण्यात आल्या.

श्री स्वामी विवेकानंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने जमा झालेल्या राख्या प्रदान करतांना किशोर घाटगे, राजेंद्र मकोटे, तसेच अन्य

या वेळी श्री स्वामी विवेकानंद चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष श्री. किशोर घाटगे म्हणाले, गेली २२ वर्षे कारगील युद्धापासून हा उपक्रम चालू आहे. या वर्षी कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर हा उपक्रम अत्यंत साधेपणाने आणि प्रतिकात्मक स्वरूपात आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रास्ताविक पत्रकार श्री. राजेंद्र मकोटे यांनी केले. या वेळी उपस्थित महिला आणि शालेय विद्यार्थिनी यांच्या हस्ते राख्या बांधून देश रक्षाबंधनाचा कार्यक्रम पार पडला. आभार डॉ. सायली कचरे व्यक्त केले. या प्रसंगी डॉक्टर संदेश कचरे, सौ. सीमा मकोटे, विजय पाटील, रेवती घाटगे, आदिती घाटगे, मालोजी केरकर यांसह विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.