साधकांच्या मनावर साधनेचे महत्त्व बिंबवणारे परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे बोलणे !

परात्पर गुरु डॉ. आठवले

१. सहज बोलण्यातूनही समोरच्यावर साधनेचे महत्त्व रुजवणे

‘परात्पर गुरुदेव सहजावस्थेत बोलतात; पण त्यांच्या एखाद्या वाक्यातूनही समोरच्यावर साधनेचे महत्त्व रुजते.

अ. एकदा एका नटाचे छायाचित्र पाहून ते म्हणाले, ‘‘हे आमच्या काळात किती प्रसिद्ध होते ! पण काय उपयोग ? शेवटी साधनाच उपयोगी येते !’’

आ. शरिराने स्थूल असलेल्या एका साधिकेला ते म्हणाले, ‘‘संत झाल्यावर जाड-बारीक असे काही नसते.’’

२. साधिकेला तिचे आजारपण स्वीकारणे कठीण वाटत असतांना परात्पर गुरुदेवांनी स्वतःचे उदाहरण देऊन तिला आनंदी रहाण्यास सांगणे

कु. रूपाली कुलकर्णी

पूर्वी माझी शारीरिक स्थिती चांगली असल्याने मी स्वयंपाकघरात सेवा करायचे. वर्ष २०१४ मध्ये अकस्मात् रुग्णाईत झाल्याने मला छोटी छोटी शारीरिक कामे करणेही अशक्य झाले होते. मला ही परिस्थिती स्वीकारणे कठीण होते. त्यामुळे मी रडायचे. माझी ही स्थिती परात्पर गुरुदेवांना कळल्यावर ते म्हणाले, ‘‘वर्ष २००७ पासून प्राणशक्ती अल्प असल्याने मी खोलीच्या बाहेर जाऊ शकत नाही; म्हणून मी रडतो का ? आता मी ग्रंथ संकलनाची सेवा करतो. तूही तुला जमेल, ते कर आणि आनंदी रहा.’’

परात्पर गुरूंचे जीवन पाहिले, तर त्यांच्या जीवनातही सर्वसामान्याप्रमाणे कठीण प्रसंग आले आहेत आणि येत आहेत, तरीही परात्पर गुरुदेव प्रत्येक वेळी आनंदी आहेत. कलियुगात माझ्यासारख्या सर्वसामान्य जिवांची गुरुदेवांचे अवतारत्व जाणण्याची आध्यात्मिक क्षमता नाही; म्हणून परात्पर गुरुदेव माझ्यासारख्या साधकांना त्यांचे अवतारत्व दाखवत आहेत.

३. एका प्रसंगात ‘संतांचे ऐकायला हवे’, असे सांगून परात्पर गुरुदेवांनी संतांचे महत्त्व मनावर बिंबवणे

एका संतांनी एक लिखाण केले होते. त्या लिखाणाचे संकलन करतांना परात्पर गुरु डॉक्टरांनी व्याकरणाच्या दृष्टीने त्यात काही पालट केले. ते पालट पाहिल्यावर त्या संतांना ते योग्य वाटले नाहीत. हे परात्पर गुरुदेवांना कळल्यावर परात्पर गुरुदेव म्हणाले, ‘‘ते संत आहेत. संतांचे ऐकायला हवे. संत सांगतील, तसेच करूया.’’

यात वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे ते संत सनातनच्या मार्गदर्शनानुसार साधना करणारे आहेत, तरीही या प्रसंगातून परात्पर गुरुदेवांनी ‘संतांचे ऐकायला हवे’, असे सांगून संतांचे महत्त्व माझ्या मनावर बिंबवले.’

– कु. रूपाली कुलकर्णी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

(११.४.२०२१)