अफगाणिस्तानमध्ये अर्धवट राहिलेले प्रकल्प पूर्ण करण्याचा तालिबानचा भारताला फुकाचा सल्ला !

भारताने अफागणिस्तानात काय करावे किंवा काय करू नये, हे तालिबानला सांगण्याचा काय अधिकार ? छोट्याशा देशातील आतंकवादी संघटना भारताला फुकाचे सल्ले देते, हे संतापजनक ! अशा तालिबानचे भारताने तोंड बंद करणे राष्ट्रप्रेमींना अपेक्षित !  – संपादक

तालिबानी प्रवक्ता सुहैल शाहीन

नवी देहली – भारताने अफगाणिस्तानात त्याचे अर्धवट राहिलेले प्रकल्प पूर्ण करावेत. भारत अफगाणिस्तानात विकासकामे करत असेल, तर त्याने ती करावीत; कारण ती जनतेसाठी आहेत; मात्र कुणीही अफगाणिस्तानची भूमी स्वत:च्या लाभासाठी, त्यांच्या देशाच्या स्वार्थासाठी वापरत असेल, तर आम्ही त्याला अनुमती देणार नाही, असे तालिबानी प्रवक्ता सुहैल शाहीन याने पाकिस्तानच्या एका वृत्तवाहिनीशी बोलतांना  सांगितले. (ही एकप्रकारे भारताचे नाव न घेता दिलेली धमकी आहे ! – संपादक)

तालिबानी सरकारमध्ये महिलांचाही समावेश असणार !

आमचे नेतृत्व पूर्णपणे इस्लामी असेल आणि सर्वांना समाविष्ट करून घेतले जाईल. त्याचसमवेत महिलांनीही सरकारसमवेत मिळून काम करावे, असे आवाहन आम्ही केले आहे, असे तालिबानच्या एका पदाधिकार्‍याने सांगितले; परंतु ‘तालिबानचे सरकार कसे असणार ?’ यावर तालिबानने स्पष्ट सांगितलेले नाही. (महिलांच्या सुरक्षेविषयी तालिबानचा आतापर्यंतचा इतिहास आणि वर्तमान पहाता त्याच्यावर कोण विश्‍वास ठेवणार ? – संपादक)

तालिबानने अफगाणिस्तानातील सर्व कर्मचार्‍यांना कामावर परतण्याचे आवाहन केले आहे. ‘सर्व लोकांनी त्यांचा दिनक्रम चालू ठेवावा. कुणालाही काहीही हानी होणार नाही’, असे तालिबानकडून सांगण्यात आले आहे.

अफगाणिस्तानात शरीयत कायदा लागू करण्याचे संकेत !

महिलांची छायाचित्रे लोक स्वत:हून रंग लावून पुसून टाकताना

अफगाणिस्तानात शरीयत कायदा लागू करण्याचे संकेत तालिबानने दिले आहेत. यामुळे भिंती, होर्डिंग्स आदींवर ज्याठिकाणी महिलांची छायाचित्रे लावली होती त्याठिकाणी लोक स्वत:हून रंग लावून ती छायाचित्रे पुसून टाकत आहेत. तालिबानी नियमानुसार महिलांनी बुरखा घालणे अनिवार्य आहे. त्यामुळे लोकांकडून अशा कृती होत आहेत.