(म्हणे) ‘तालिबानने अफगाणिस्तानला आतंकवाद्यांचे आश्रयस्थान बनवू नये !’ – तालिबानशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करणार्‍या चीनची फुकाची चेतावणी

आतंकवाद्यांचा कारखाना असलेला पाकिस्तान चीनचा मित्र आहे. तालिबान्यांशी मैत्रीपूर्ण संबंध आहेत, असेही चीनने म्हटले होते. असे असतांना या चेतावणीला अर्थ काय ?आंतरराष्ट्रीय समुदायाने चीनच्या अशा विधानांवर कदापि विश्‍वास ठेवू नये ! – संपादक

न्यूयॉर्क (अमेरिका) – तुम्ही (तालिबान) शांततेत राज्य करा; पण अफगाणिस्तानला आतंकवाद्यांचे आश्रयस्थान बनवू नका, अशी फुकाची चेतावणी चीनने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील आपत्कालीन बैठकीत दिली आहे. चीनने सुरक्षा परिषदेचे उप स्थायी प्रतिनिधी गेंग शुआंग यांनी ही चेतावणी दिली आहे. एक दिवसापूर्वीच चीनने तालिबानशी ‘मैत्रीपूर्ण संबंध’ ठेवण्याचे म्हटले होते आणि आता दुसर्‍याच दिवशी असे विधान केले आहे.

गेंग शुआंग

१. गेंग शुआंग म्हणाले की, सर्व देशांनी आंतरराष्ट्रीय कायदे आणि सुरक्षा परिषदेचा ठराव यांनुसार स्वतःचे दायित्व पूर्ण केले पाहिजे. इस्लामिक स्टेट, अल् कायदा यांसारख्या आतंकवाद्यांशी लढण्यासाठी एकमेकांसमवेत काम केले पाहिजे. अल् कायदा पूर्व तुर्कस्तानमध्ये पुन्हा सक्रीय होऊ शकते. त्यामुळे याकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे.

२. ‘ईस्ट तुर्कस्तान इस्लामिक मुव्हमेंट’ ही बंदी घातलेली आतंकवादी संघटना अल् कायदाचीच शाखा आहे आणि ती चीनच्या उघूर मुसलमानबहुल शिनजियांग प्रांताला मुक्त करण्यासाठी लढा देत आहे.