चायनीज मांजाने चिरला गळा !

चायनीज मांजाच्या वापरामुळे गळा कापल्याची उदाहरणे समोर येत असतांना पोलिसांना चोरून मांजा विकणारे कसे सापडत नाहीत ?

जखमी झालेले उमेश हरि चव्हाण

सातारा, १४ ऑगस्ट (वार्ता.) – जिल्ह्यामध्ये चायनीज मांजाच्या विक्रीला बंदी असूनही फलटण तालुक्यात मोकाटपणे चायनीज मांजाची विक्री चालू आहे. मांजामुळे फलटण तालुक्यातील झिरपवाडी येथील उमेश हरि चव्हाण यांचा गळा चिरला आहे.

उमेश हे १२ ऑगस्ट या दिवशी वडजल येथून फलटणकडे येत होते. तेव्हा लोणंद रस्त्यावर स्मशानभूमी परिसरामध्ये चायनीज मांजा त्यांच्या गळ्याला लागला आणि त्यांचा गळा चिरला गेला. या अपघातामध्ये उमेश हे चायनीज मांजामुळे गंभीर घायाळ झाले. तातडीने त्यांना खासगी रुग्णालयामध्ये भरती करण्यात आले. तेथे त्यांच्या गळ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियेमध्ये त्यांच्या गळ्याला ४८ टाके घालण्यात आले. यामुळे चोरून चायनीज मांजा विकाणार्‍यांच्या विरोधात नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.