सातारा येथे पूरग्रस्तांना अन्यत्र हलवण्यासाठी शिक्षण विभागाचे महसूल विभागाला पत्र !

अशी मागणी शिक्षण विभागाला का करावी लागते ?

प्रतीकात्मक छायाचित्र

सातारा, १४ ऑगस्ट (वार्ता.) – २२ जुलै या दिवशी झालेल्या अतीवृष्टीमुळे कोयना विभागातील ५ गावांवर संकट कोसळले होते. या वेळी पूरग्रस्तांना कोयनानगर येथील मराठी शाळा, नेताजी सुभाषचंद्र बोस हायस्कूल आणि न्यू इंग्लिश स्कूल चाफेर मिरगाव या विद्यालयांत सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले होते. कोरोना काळात बंद असलेल्या शाळा १७ ऑगस्टपासून चालू होत आहेत. पूरग्रस्तांना या शाळेत ठेवल्यामुळे शाळा चालू करण्यास अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे पूरग्रस्तांना अन्यत्र सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात यावे, अशी मागणी शिक्षण विभागाने महसूल विभागाकडे पत्राद्वारे केली आहे.

पूरग्रस्तांना स्थलांतरित करण्यासाठी मोडकळीस आलेल्या वसाहतीमध्ये तात्पुरते स्थलांतर करण्यात येणार आहे. त्यामुळे या वसाहतीमधील खोल्यांच्या दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर चालू आहे. हे काम पूर्ण होण्यासाठी अजून १ मास लागेल. यातच शाळा व्यवस्थापनाने पूरग्रस्तांना अन्यत्र हलवण्याची मागणी शिक्षण विभागाकडे केली आहे. भूस्खलनामुळे कोयना विभागातील ढोकावळे गावातील २३०, मिरगाव येथील ५३१, बाजे येथील १४४ आणि गोकुळ नाला येथील १२६ बेघर नागरिकांना स्थलांतरित करण्यात आले आहे.

स्थलांतराविषयी प्रांताधिकारी आणि महसूल प्रशासन निर्णय घेईल ! – दीपा बोरकर, गटशिक्षणाधिकारी

याविषयी पाटण येथील गटशिक्षणाधिकारी दीपा बोरकर यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या की, शिक्षण विभागाने आदेश दिल्याप्रमाणे १७ ऑगस्टपासून शाळा चालू होणार आहेत. शाळा चालू होणार असल्याने पूरग्रस्तांना अन्यत्र हलवणे आवश्यक आहे. त्यामुळे या लोकांना अन्यत्र सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याची लेखी मागणी प्रांताधिकारी आणि महसूल प्रशासनाकडे केली आहे. याविषयी पुढील निर्णय आता तेच घेणार आहेत.