वेंगुर्ले केंद्रावर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा आणि शिष्यवृत्ती परीक्षा यांसाठी जिल्ह्याबाहेरील मुले बसवल्याचा आरोप

जिल्हा परिषद शिक्षण समिती सभापती यांनी मागवला अहवाल

वेंगुर्ले – नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा वर्ष २०२०-२१ साठी वेंगुर्ले तालुक्यातील रा.कृ. पाटकर हायस्कूल या केंद्रावर १६९ विद्यार्थी बसले होते. त्यांपैकी ३५ ते ४० विद्यार्थी अन्य जिल्ह्यांतील होते, तसेच इयत्ता ५ वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेस ४ केंद्रांवर ३५९ विद्यार्थी आणि इयत्ता ८ वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेस २ केंद्रांवर १२५ विद्यार्थी बसले आहेत. यांपैकी काही विद्यार्थी अन्य जिल्ह्यांतील असल्याची तक्रार स्थानिक विद्यार्थ्यांच्या पालकांनी भाजपच्या पदाधिकार्‍यांकडे केली. त्यानंतर भाजपच्या शिष्टमंडळाने पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी यांची भेट घेऊन या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली.

जिल्हा परिषद शिक्षण समिती सभापतींनी मागवला अहवाल

भाजपचे जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई यांनी या प्रकरणी जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीच्या सभापती सौ. अनिषा दळवी यांच्याकडे तक्रार केली. त्यानंतर सभापती सौ. दळवी यांनी गटशिक्षणाधिकारी गोसावी यांना या प्रकरणाचा चौकशी अहवाल सादर करण्याचा आदेश दिला.

गेल्या वर्षीही नवोदय विद्यालयाच्या प्रवेश परीक्षेत अशाच पद्धतीने वेंगुर्ले तालुक्यात जिल्ह्याच्या बाहेरील विद्यार्थी बसवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता.