सावित्री नदीवरील दुर्घटनेचे प्रकरण
चौकशी आयोगाच्या संशयास्पद अहवालाविषयी हिंदु जनजागृती समितीची मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी !
मुंबई, ११ ऑगस्ट (वार्ता.) – रायगड जिल्ह्यातील सावित्री नदीवरील पूल २ ऑगस्ट २०१६ या दिवशी झालेल्या अतीवृष्टीत वाहून गेला. यात २ बसगाड्या आणि १ चारचाकी वाहून गेली. दुर्घटनेत ४२ जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात प्रशासनाच्या गंभीर चुका ठळकपणे दिसून येत असतांना चौकशी आयोगाने सर्वांना ‘क्लीन चीट’ (निर्दोषत्व) दिली आहे. या संवेदनशील प्रकरणात चौकशी आयोगाने दिलेली ‘क्लीन चीट’ हा असंवेदनशीलतेचा प्रकार असून आयोगाने सादर केलेल्या अहवालाचा पुनर्विचार व्हावा आणि दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी करणारे निवेदन ११ ऑगस्ट या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावे मंत्रालयात देण्यात आले. सार्वजनिक बांधकाममंत्री (सार्वजनिक उपक्रम) एकनाथ शिंदे यांनाही या निवेदनाची प्रत देण्यात आली.
या दुर्घटनेच्या चौकशीसाठी तत्कालीन सरकारने मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती एस्.के. शहा यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्यीय आयोगाची स्थापना केली होती. या आयोगाने या दुर्घटनेच्या चौकशीअंती सर्वांना दिलेल्या ‘क्लीन चीट’ प्रकरणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आश्चर्य व्यक्त करण्यात आले आहे. समितीने या निवेदनामध्ये प्रशासन आणि पोलीस यांच्याकडून झालेल्या गंभीर चुका मांडल्या आहेत. भविष्यात सावित्री पुलाप्रमाणे कोणतीही दुर्दैवी घटना घडू नये, यासाठी राज्यातील धोकादायक पुलांची दुरुस्ती तातडीने करण्याची विनंतीही या निवेदनामध्ये करण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यातील रेवदंडा, नागोठणे, रोहा, खारपाडा येथील दुरवस्था झालेल्या पुलांची छायाचित्रेही या निवेदनासमवेत जोडण्यात आली आहेत.