|
नवी देहली – देशाची राजधानी देहलीत स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने कार्यक्रमाची सिद्धता चालू असतांना सुरक्षेविषयीही सतर्कता बाळगण्यात येत आहे. देहली पोलिसांकडून लाल किल्ल्याजवळ पसार झालेल्या ६ आतंकवाद्यांची छायाचित्रे आणि माहिती असणारी भित्तीपत्रके लावण्यात आली आहेत. हे आतंकवादी दिसल्यास त्यांची माहिती तात्काळ पोलिसांना देण्याचे आवाहन यातून करण्यात आले आहे.
पोलिसांनी म्हटले की, हे सहाही आतंकवादी ‘अल् कायदा’ या आतंकवादी संघटनेशी संबंधित आहेत. गुप्तचर यंत्रणांकडून माहिती मिळाल्यानंतर ही भित्तीपत्रके लावण्यात आली आहेत. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने हे आतंकवादी केवळ देहलीच नव्हे, तर देशातील कोणत्याही भागात कारवाया घडवून आणू शकतात. शेतकरी आंदोलनाच्या नावाखाली काही लोक देहलीमध्ये आतंकवादी कारवाया घडवून आणण्याचा प्रयत्न करू शकतात. त्यांच्याकडून यासाठी ड्रोनचाही वापर केला जाऊ शकतो. यामुळे ड्रोन उडवण्यावर बंदी ही घालण्यात आली आहे.