कोरोनावरील २ डोस घेतलेल्या नागरिकांना लोकलमधून प्रवास करण्यास मिळण्यासाठी मुंबईत भाजपकडून आंदोलन !

आंदोलन करतांना विनातिकिट प्रवास करण्याचा प्रयत्न

मुंबई – कोरोनावरील २ डोस घेतलेल्या नागरिकांना लोकलमधून प्रवास करण्यास मिळावा, यासाठी भाजपकडून मुंबईत चर्चगेट, दहिसर, घाटकोपर, कांदिवली आदी ठिकाणी आंदोलन करण्यात आले. भाजपचे मुंबई अध्यक्ष आमदार मंगलप्रभात लोढा आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले.

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी पोलिसांचा पहारा ठेवण्यात आला होता. चर्चगेट रेल्वेस्थानकाच्या बाहेर प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. या वेळी प्रवीण दरेकर यांच्यासह काही कार्यकर्त्यांनी लोकलमधून चर्नीरोडपर्यंत विनातिकिट प्रवास केला. त्यामुळे तिकिट तपासनीसाने त्यांना २६० रुपये एवढा दंड आकारला. कांदिवली येथे आमदार अतुल भातखळकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. घाटकोपर येथेही भाजपच्या कार्यकर्त्यांनी रेल्वेस्थानकामध्ये विनातिकिट घुसण्याचा प्रयत्न केला. या वेळी काही आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी कह्यात घेतले.